पुणे : ‘शहरात होणारे गंभीर अपघात रात्रीच्या सुमारासच घडत असून, याला जबाबदार रात्री निद्रावस्थेत जाणारी प्रशासकीय यंत्रणा आहे,’ असा ठपका वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून ठेवण्यात आला आहे. ‘रात्रीनंतर जास्त रहदारी नसते, म्हणून वाहतूक नियंत्रण दिवे बंद (सिग्नल) करून निद्रावस्थेत जाणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेने या वेळेतही कायद्याची अंमलबजावणी सुरू ठेवली, तर अपघातांचे प्रमाणे नक्की कमी होईल,’ असा दावादेखील तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे.

वाघोली येथे मद्यधुंद डंपरचालकाने नऊ जणांना चिरडल्याची घटना घडल्यानंतर सामाजिक संघटनांकडून प्रशासकीय यंत्रणांच्या कार्यशैलीवर बोट ठेवण्यात आले आहे. ‘पुणे शहराचा निरंतर विस्तार होत आहे. शहर-उपनगरांमध्ये महामार्गालगत रात्रीच्या वेळीही मोठे माॅल, कंपन्या, कार्यालये, मद्यालये, उपहारगृहे, हाॅटेल सुरू असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेतही रस्त्यांवर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. मात्र, आपल्याकडे रात्रीच्या वेळी वाहतूक दिवे बंद केले जातात. मुख्य रहदारीच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठीदेखील पोलीसांची अनुपस्थिती असते. त्यामुळे रात्रीच्या अपघातांत वाढ झाली आहे,’ असे निरीक्षण परिसर संस्थेचे रणजित गाडगीळ यांनी नोंदवले.

हेही वाचा – रेल्वे प्रवासी सावधान! या ठिकाणांवरूनच आसन आरक्षित करा

हेही वाचा – मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी; दहा ते बारा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा

‘रात्रीच्या वेळी मद्यसेवन करून बिनदिक्कत वाहने चालविली जात असून, आता रहदारी नाही, पोलीस नाहीत म्हणून वाहनांचे दिवे लावून बिनधास्त उलट्या दिशेनेदेखील वाहनांचा प्रवास सुरू असतो. शहरातील हडपसर, वाघोली, चांदणी चौक, बाणेर, हिंजवडी, भोसरी आणि उपनगरांच्या परिसरातील मार्गांवर रात्रीत अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. मात्र, चौकाचौकात लावण्यात आलेले वाहतूक नियंत्रण दिवे (सिग्नल) सुरू ठेवले, तसेच रहदारीच्या मार्गांवर वाहतूक पोलिसांची उपस्थिती बंधनकारक केल्यास भीषण अपघात नक्कीच रोखता येतील,’ असेही गाडगीळ म्हणाले.

तज्ज्ञांची निरीक्षणे

  • रात्री सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहनचालकांची मुजोरी
  • पोलिसांचा धाक नसल्याने रात्री एकेरी रस्त्यावर सर्रास दुहेरी वाहतूक
  • अवजड वाहनांचे नियमपालनाकडे दुर्लक्ष
  • मद्यसेवन करून वाहने चालवणाऱ्यांना चाप नाही

Story img Loader