पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांकडून गोंधळ घालण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. किरकोळ वादातून दोन्ही बाजूंकडील किमान शंभर दीडशे समर्थक पोलीस ठाण्यात जमतात आणि गोंधळ घालण्यास सुरुवात केली जाते. शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत अशा प्रकारच्या घटना नेहमीच घडतात. अशा घटना पाहण्याची सवय सामान्यांना नसते. मात्र, पोलीस ठाण्यात अशा प्रकारचे दृश्य किमान महिन्यातून एकदा तरी अनुभवायाला मिळते. पोलीस ठाण्यातील ‘गोंधळ’ पोलिसांच्या दृष्टीने तापदायक झाला आहे. कारवाईपेक्षा गोंधळ घालणाऱ्यांना आवरण्याचे काम पोलिसांना करावे लागते.
आठवडाभरात पुण्यातील वेगवेगळ्या भागांत अशा प्रकारच्या दोन घटना घडल्या. विसर्जन मिरवणुकीत झालेल्या वादातून दोन तरुणांना मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच भवानी पेठेतील कासेवाडीत घडली. या घटनेला जातीय रंग देऊन स्वारगेट पोलीस ठाण्यासमोर पाचशे जणांचा जमाव पोलीस ठाण्यासमोर जमला. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात घोषणाबाजी सुरू झाली. घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी समजावून सांगितले. दोन दिवसांपूर्वी वानवडी पोलीस ठाण्यात अशाच प्रकारची एक घटना घडली. कौटुंबिक वादातून एका महिलेने तिच्या लहान मुलींना मारहाण केली. त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात पुन्हा गोंधळ घातला. पोलीस ठाण्याच्या आवारातील वाहनांवर दगडफेक केली. अखेर संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करुन तिला अटक करण्यात आली.
हेही वाचा – पुण्यावर आता ‘एआय’ कॅमेऱ्यांंची नजर, २८६६ कॅमेरे बसविण्यासाठी ४३३ कोटी मंजूर
गेल्या काही वर्षांपासून पोलिसांनीही त्यांच्या कार्यपद्धतीत बदल केला आहे. वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांना आता नागरिकांना ‘समजावून’ सांगण्याची वेळ आली आहे. प्रत्येक जण कोणत्या तरी पक्षाचा कार्यकर्ता असतो. थेट राजकीय पक्षाच्या नेत्यांशी संबंध असल्याचे सांगून पोलिसांवर दबाब टाकला जातो. किरकोळ वादातील तक्रारी देताना किमान शंभर कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जमतात. त्यानंतर कार्यकर्त्यांकडून पोलिसांवर दबाब टाकला जातो. गु्न्हा दाखल कसा करायचा, कोणती कलमे लावायची, याचेही प्रशिक्षण कार्यकर्ते पोलिसांना देतात. पोलीस ठाण्यातील अशा गोंधळामुळे कामकाजावर परिणाम होतो. त्यातून पोलीस आणि तक्रारदारांमध्ये वाद होताे. प्रसंगी पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांच्या अंगावर हात टाकण्याच्या घटना घडतात. अशा प्रकारचे कृत्य करणे हा गुन्हा आहे, याची जाणीवही अनेकांना नसते. गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. नाेकरी मिळवताना लागणारे चारित्र्य प्रमाणपत्र मिळत नाही, तसेच पारपत्र मिळवताना अडचणींना सामोरे जावे लागते.
पोलीस ठाण्यांप्रमाणेच रस्त्यावरही अशा प्रकारचे दृश्य नेहमीच पाहायला मिळते. वाहतूक नियमांचा भंग करणारे अनेकजण पोलिसांशी वाद घालतात. कारवाई करताना पोलिसांना रोखले जाते. वरिष्ठ अधिकारी, राजकीय पक्षांच्या नेत्यांशी सलगी असल्याचे सांगून अरेरावी केली जाते. प्रसंगी पोलिसांवर हात उचलला जातो. गेल्या काही वर्षांपासून समाजमाध्यमांचा वापर वाढीस लागला आहे. कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला रोखण्यासाठी काही ‘सजग’ नागरिक मोबाइलवर चित्रीकरण करतात. चित्रीकरणात फक्त एकच बाजू चित्रीत केली जाते. अशा प्रकारची चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित केली जाते. चित्रफितीसह संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला जातो. नागरिकांच्या तक्रारीनंतर संबंधित पोलीस कर्माचाऱ्याची खातेनिहाय चौकशी होऊन त्याला निलंबित केले जाते. सध्या प्रत्येक जण सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकाराच्या भूमिकेत वावरत आहे. कारवाई करताना पोलिसांना त्रासाला सामाेरे जावे लागते. वाहतूक नियमभंगाची कारवाई करताना पोलिसांनी बाॅडी कॅमेऱ्यांचा वापर करावा, असा आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे. बाॅडी कॅमेऱ्यामुळे कारवाई प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडते आणि आरोपही फेटाळले जाऊ शकतात. पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारदाराशी सौजन्याने वागणे गरजेचे आहे. सौजन्यामुळे अनेक कटू प्रसंग टाळले जाऊ शकतात. नागरिकांची गाऱ्हाणी ऐकून घेताना पोलिसांना संयम पाळावा लागणार आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून कायदेशीर चौकटीत कारवाई करावी लागणार आहे. कायदेशीर चौकटीत राहून कारवाई केल्यास पोलिसांना आरोपांना सामाेरे जावे लागणार नाही.
rahul.khaladkar@expressindia.com