पिंपरी : सेल्फी काढत असताना पाय घसरून पडल्याने तरुणाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाला. तर, तरुणी बेपत्ता आहे. ही घटना मावळ तालुक्यातील इंदोरीतील कुंडमळा येथे गुरुवारी ( ५ सप्टेंबर) रोजी घडली. रोहन ज्ञानेश्वर ठोंबरे (वय २२, रा. चिंचवडगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, श्रेया सुरेश गावडे (वय १७, रा. चिंचवडगाव) असे बेपत्ता तरुणीचे नाव आहे.
तळेगाव – एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन हा खासगी कंपनीत नोकरी करीत होता. तर, श्रेया ही अकरावीत शिक्षण घेते. चिंचवडगावातील सहा मुले आणि दोन मुले असा आठ जणांचा ग्रुप कुंडमळा येथे सकाळी आठ वाजता फिरण्यासाठी आला होता. श्रेया आणि रोहन हे कुंडमळा येथील देवीच्या मंदीराशेजारी नदीकडेला सेल्फी घेत होते. त्यावेळी दोघांचा पाय घसरला आणि दोघेही नदीपात्रात पडून वाहून गेले. इतर मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक मदतीला आले.
हेही वाचा – पुणे : विसर्जन मिरवणूक रद्द करून गणशोत्सवात आरोग्य जागर
हा प्रकार त्वरीत तळेगाव – एमआयडीसी पोलिसांना कळविण्यात आला. तसेच, वन्यजीव रक्षक मावळ, आपदा मित्र यांना पाचारण करण्यात आले. या पथकाने दिवसभर शोधमोहिम राबवली. सायंकाळी साडेचारच्या सुमारास रोहनचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले. तर, सायंकाळी उशिरापर्यंत श्रेयाचा शोध सुरू होता. सायंकाळी अंधार पडल्याने शोधमोहिम थांबवण्यात आली. शुक्रवारी सकाळी पुन्हा शोधमोहिम राबविण्यात येणार आहे.