पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील ‘स्मार्ट शहर’ होण्याची क्षमता पुण्यात आहे. त्यासाठी आराखडा तयार करून पुण्याचा पाच वर्षांत पूर्णपणे कायापालाट करू, असे केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी रविवारी सांगितले.
‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिजीवी संमेलनात गोयल यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी माजी खासदार प्रदीप रावत, फ्रेंड्स ऑफ बीजेपीच्या प्रदेश समन्वयक उषा वाजपेयी, अनिल गोयल, हितेश जैन, सिद्धार्थ शिरोळे, श्रीपाद ढेकणे, संतोष दत्त, ब्रिगेडियर हेमंत महाजन आदी उपस्थित होते.
यावेळी गोयल म्हणाले, ‘पुणे हे शिक्षण, तंत्रज्ञान, उद्योग अशा सर्वच बाबतीत आघाडीवर असलेले शहर आहे, तरीही पुण्यात अजूनही रिंगरोड पूर्ण होऊ शकलेला नाही. मात्र, अहमदाबादला तीन रिंगरोड झाले आहेत. पुण्यात मेट्रो प्रकल्प व्हावा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करू. पुण्यात विकासाची क्षमता आहे. मात्र, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार विरहित आणि संतुलित विकास करणारे सरकार राज्यातही येणे गरजेचे आहे. पुण्याचा पाच वर्षांमध्ये कायापालट करू.’