वनस्पती, फुले, पीक, सस्तन प्राणी, पक्षी, उभयचर प्राणी, कीटक, खनिज हे सारे चराचर सृष्टीचे अविभाज्य भाग! निसर्गाचे जतन करण्याची बाब माणूस विसरला असला तरी काही जण त्यासाठी दक्ष असतात. निसर्ग आणि त्यातील जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी दक्ष असलेल्या मंडळींनी पुण्यात अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. आता पुणे जिल्ह्य़ाची निसर्ग मानचिन्हे ठरविण्यात येणार आहेत; तीसुद्धा लोकशाही पद्धतीने जनमताद्वारे! ही मानचिन्हे निवडण्याची संधी पुणेकरांना लाभली असून स्थानिक पातळीवरील जैवविविधतेच्या संरक्षणाच्या दृष्टीने देशभरात असा उपक्रम राबविण्यामध्ये पुण्यालाच बहुमान मिळत आहे.
प्रतीकात्मक निसर्ग मानचिन्हे एखाद्या प्रदेशाच्या नैसर्गिक तसेच जैविक साधन संपत्तीचे प्रतिनिधित्व करतात. ही मानचिन्हे सामान्य जनतेमध्ये निसर्ग रक्षण आणि जनजागृतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. एवढेच नव्हे, तर जनसामान्यांमध्ये निसर्गविषयक अस्मिता जागृत करतात. भारतासारख्या विशाल भौगोलिक आणि निसर्गदृष्टय़ा संपन्न राष्ट्रामध्ये याची निश्चितच गरज आहे. स्थानिक पातळीवर वैज्ञानिकदृष्टय़ा ठरविलेली निसर्ग मानचिन्हे काही दुर्लक्षित आणि प्रदेशनिष्ठ प्रजातींच्या संरक्षणाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. हे ध्यानात घेऊन बायोस्फिअर्स, पुणे वनविभाग, इंद्रधनुष पर्यावरण केंद्र, पुणे महापालिका, एम्प्रेस गार्डन आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्य़ाची मानचिन्हे ठरविण्याचा संकल्प केला आहे.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात डिसेंबरमध्ये झालेल्या जीविधता महोत्सवामध्ये निसर्ग मानचिन्हविषयक निकष या विषयावरील चर्चासत्राने झाली. यामध्ये विविध तज्ज्ञांकडून निसर्गविषयक वेगवेगळ्या १८ प्रकारांमध्ये पुणे जिल्ह्य़ातील नामांकने मागविण्यात आली आहेत. यामध्ये जिल्ह्य़ाचे सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी, अष्टपाद, कीटक, जलचर, वनस्पती, फुलं, नेचे, कवक, जिवाश्म, पीक, पिकाचा रानटी भाऊबंद, खनिज अशा गटांमध्ये ही नामांकने आली आहेत. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये रविवारी (२ फेब्रुवारी) सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या या नामांकनावर चर्चा होऊन दोन अंतिम नामांकने तज्ज्ञांममार्फत निवडली जातील. महापौर चंचला कोद्रे, डॉ. योगेश शौचे, डॉ. मुकुंद देशपांडे, जीत सिंग, नितीन काकोडकर, सुनील लिमये, डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांच्यासह विविध विषयातील तज्ज्ञ या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक राजेंद्र कदम आणि बायोस्फिअर्सचे संस्थापक सचिन पुणेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशी आहे मानचिन्हे ठरविण्याची प्रक्रिया
– रविवारी (२ फेब्रुवारी) जिल्ह्य़ाची प्रतीकात्मक मानचिन्हे ठरविण्यासाठी कार्यशाळा
– १८ प्रकारांमध्ये प्रत्येक गटातील दोन अंतिम नामांकनांची तज्ज्ञांमार्फत निवड
– विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये याविषयीचे जागृती कार्यक्रम
– लोकशाही पद्धतीने जनमताद्वारे निसर्ग मानचिन्हे ठरविण्याची पुणेकरांना मिळणार संधी
– जनतेने निवडलेली मानचिन्हे प्रशासकीय मान्यतेसाठी वन्यजीव महामंडळाकडे करणार सुपूर्द
– जिल्हा स्तरावर मानचिन्हे ठरविण्याचा बहुमान देशभरामध्ये प्रथम पुण्याला मिळणार

निसर्ग मानचिन्हांमध्ये काय काय? :
सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी, अष्टपाद, कीटक, जलचर, वनस्पती, फूल, नेचे, कवक, जिवाश्म, पीक, पिकाचा रानटी भाऊबंद, खनिज

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune will get nature honour