लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : येत्या काळात पुणे ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’ म्हणून नावारूपास येणार असून उद्याोजक, कंपन्या पुण्यात आकर्षित होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या ‘सेमीकंडक्टर मिशन’ अंतर्गत रांजणगाव येथे प्रस्तावित इलेक्ट्रॉनिक उत्पादन संकुलाचे (मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर) काम येत्या दीड वर्षात पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी दिली.
‘स्टोरियन एचके’ आणि ‘आयएफबी’ या दोन मोठ्या कंपन्यांकडून या संकुलाची उभारणी सुरू असून येत्या काळात ५०० कोटी रुपयांचा निधी यासाठी देण्यात येईल. सेमीकंडक्टरशी निगडित विविध प्रश्न सोडवण्यासाठी मदत होईल. शिवाय देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन वाढेल. या परिसरातील उत्पादक कंपन्यांनाही या संकुलाचा फायदा होईल,’ असे वैष्णव यांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा-प्रसिद्ध संगीतकार-गायक राहुल घोरपडे यांचे निधन
पुण्यातील ‘सी-डॅक संस्थेला भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वैष्णव म्हणाले, ‘भारत विकसित देश होण्यासाठी २०४७ पर्यंत होईल. त्या अनुषंगाने संगणकीय आणि तंत्रज्ञानाचा विकास हा मुख्य पाया असून ‘सी-डॅक’ची त्यात अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. ‘आयआयटी मद्रास’, बेंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्था (आयआयएस्सी), ‘आयआयटी गांधीनगर’ या शैक्षणिक संस्थांमध्ये सेमीकंडक्टर आणि संगणकीय क्षेत्रातील संशोधन कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या सर्व संशोधन कार्याला एकाच छताखाली आणून पुढे मार्गक्रमण करण्यासाठी एकसंध आणि सुसंगत मार्ग कसा तयार करता येईल, यावर आढावा बैठकीत चर्चा करण्यात झाली आहे. जवळपास २४० संस्थांमध्ये चिप्स डिझाइन करण्यासाठी आवश्यक प्रगत उपकरणे उपलब्ध असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.