पुणे : पुणे आंतराष्ट्रीय विमानतळ परिसरातील कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना हाती घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या नवीन टर्मिनल परिसरातील रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहने लावण्यास मनाई (नो-पार्किंग झोन) करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतला आहे. त्यानुसार या भागात रिक्षा, तसेच मोटारी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विमानतळावरील नवीन टर्मिनलवर प्रवाशांना मोटारीेने (कॅब) सोडण्याची परवानगी आहे. मात्र, तेथून प्रवाशांची वाहतूक करण्याची मुभा नाही. प्रवाशांना कॅब सेवा घेण्यासाठी एरोमाॅल परिसरात जावे लागते. नवीन टर्मिनल ते एरोमाॅल दरम्यान अंतर आहे. त्यामुळे तेथे दोन इलेक्ट्रिक बस आणि सहा गोल्फ कार्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सेवा निशुल्क असून, प्रवाशांना नवीन टर्मिनलमधून एरोमाॅलपर्यंत जाता येते. जुन्या टर्मिनलपासून एराेमाॅलपर्यंत जाण्यासाठी उन्नत पादचारी मार्ग आहे. या भागात सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर अनेक प्रवासी रस्त्याचा वापर करतात. तसेच, या भागात प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारी आणि रिक्षा थांबतात. त्यामुळे या भागात वाहतूक काेंडी होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.
या भागातील कोंडी सोडविणे, तसेच उपाययोजना करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी बैठकीचे आयोजन केले होते. या भागातील समस्या सोडविण्यात याव्यात, तसेच सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास मनाई करण्यात यावी, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.
येरवडा भागातील पब, तसेच रेस्टॉरंटच्या बाहेर गर्दी होती. रात्री या भागातील वाहतूक विस्कळीत होते. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या असून, नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.
विमानतळ परिसरातील कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रवाशांना त्रास होऊ नये, यादृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात, याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत प्रत्यक्ष आढावा घेण्यात येणार असून, रस्त्यांची पाहणी केली जाणार आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त