पुणे : थंडीचा जोर चांगलाच वाढल्याने पुणे आणि परिसर गारठल्याचे चित्र आहे. किमान तापमानात घट होत असल्याने आज (१६ डिसेंबर) यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांत शहरातील हवामानात सातत्याने बदल झाले आहेत. दिवाळीनंतर थंडी पडण्यास सुरुवात झाली. सातत्याने दिवसा आणि रात्रीच्या तापमानात घट होत राहिली. त्यामुळे शहरातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), शिवाजीनगर अशा काही ठिकाणी किमान तापमान एक आकडी नोंदवले गेले. पुण्यात ८ ते ९ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले होते. दिवसा हुडहुडी भरण्याइतका गारवा निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळाने या थंडीचा प्रभाव कमी केला. हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढल्यामुळे कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली. त्यामुळे ऐन हिवाळ्यात उकाडाही सहन करावा लागला. त्यानंतर आता पुन्हा गारवा निर्माण झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : गायक संजय मराठे यांचे निधन

हवामान विभागाच्या नोंदीनुसार सोमवारी एनडीए येथे सर्वांत कमी ६.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्यानंतर शिवाजीनगर येथे ७.८, लोहगाव येथे १२, कोरेगाव पार्क येथे १३.१, चिंचवड येथे १४.५ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात थंडीची लाटसदृश स्थिती आहे. बऱ्याच ठिकाणी एक आकडी तापमान नोंदवले गेले आहे. त्यामुळे सध्या जाणवत असलेली थंडी आणखी काही दिवस राहण्याची शक्यता आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune winter updates temperature declined to 8 degree celsius cold weather pune print news ccp 14 css