सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या दोन महिलांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. आरोपी महिलांनी गोवा, हैद्राबाद, फलटण तसेच पुणे शहरातील सराफी पेढीत चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. महिलांकडून चोरीचे दागिने घेणाऱ्या एकास अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> पुणे : कर्ज मंजुरीच्या आमिषाने १०० ते १५० जणांची फसवणूक ; गुजरातमधून जोडपे अटकेत
सुचित्रा किशोर साळुंखे (वय ५०, रा. केशवनगर, शिंदे वस्ती, मुंढवा), कोमल विनोद राठोड (वय ४५, रा. व्हीआयटी कॅालेजजवळ, अप्पर इंदिरानगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघींकडून चोरीचे दागिने विकत घेणारा अश्विन सोळंकी (वय ४२, रा. येरवडा) याला अटक करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ परिसरातील एका सराफी पेढीत साळुंखे आणि राठोड खरेदीच्या बहाण्याने गेल्या होत्या. दोघींनी सराफी पेढीतून सोनसाखळी लांबविली होती. सराफ व्यावसायिकाने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली होती.
हेही वाचा >>> ज्येष्ठ नागरिकाच्या घरातून २२ लाखांची रोकड लंपास; पुण्यातील सॅलसबरी पार्क परिसरातील घटना
पोलिसांनी सराफी पेढीतील सीसीटीव्ही चित्रीकरण पडताळले. त्यानंतर पोलिसांनी महिलांचा माग काढण्यास सुरुवात केली. तपासात साळुंखे आणि राठोड यांनी दागिने चोरल्याची माहिती पोलीस कर्मचारी मितेश चोरमोल, अभिनय चौधरी यांना मिळाली. त्यानंतर दोघींना अटक करण्यात आली. चाैकशीतील दोघींनी गोव्यातील वास्को शहरातील सराफी पेढी तसेच हैदराबाद, फलटण परिसरातील पेढीतून खरेदीच्या बहाण्याने दागिने लांबविल्याचे निष्पन्न झाले. दोघींकडून चोरीचे दागिने विकत घेणारा अश्विन सोळंकी याला अटक करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिंदे, रवींद्र चिप्पा, गणेश भोसले, मंगेश पवार, अवधूत जमदाडे, आशिष गायकवाड, विक्रम सावंत आदींनी ही कारवाई केली.