मागील दोन महिन्यांपूर्वी दौंड तालुक्यात कडेठाण गावात बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे समोर आले होते. पण त्या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला नव्हता, तर पुतण्यासोबत त्या महिलेचे अनैतिक संबध होते आणि त्या दोघांमध्ये पैशावरून वाद होत असायचे, त्यातून पुतण्याने साथीदाराच्या मदतीने चुलतीचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुतण्या अनिल पोपट धावडे आणि साथीदार सतीलाल वाल्मिक मोरे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. लता धावडे असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पुतण्या अनिल पोपट धावडे आणि मृत लता धावडे या दोघांमध्ये अनेक महिन्यांपासून अनैतिक संबंध होते. पण मध्यंतरी लता धावडे या आरोपी अनिल धावडेकडे पैशांची मागणी करीत होत्या आणि सततच्या पैशाच्या मागणीला अनिल वैतागला होता. तर अनिल पैसे देत नव्हता, त्यामुळे लता धावडे या त्याला भेटण्यास येत नव्हत्या. त्यामुळे अनिल धावडे यांनी त्याचा साथीदार सतीलाल मोरे याच्या मदतीने लता धावडे हिच्या खुनाचा कट रचून तिच्या डोक्यात दगड घालून हत्या केली आणि लता धावडे यांचा मृतदेह शेताच्या बाजूला टाकला. बिबट्याच्या हल्ल्यात लता धावडे यांचा मृत्यू झाल्याचा बनाव त्यावेळी करण्यात आला होता.
पोलिसांनी त्यावेळी पंचनामा करून व्हिसेरा तपासणीसाठी नागपूरच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. त्या प्रकरणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, त्या महिलेचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला नसल्याचे नमूद करण्यात आले. त्या प्रकरणातील आरोपीचा शोध सुरू असताना, सतीलाल मोरे या आरोपीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने, त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्याने आणि अनिल धावडे या दोघांनी मिळून लता धावडे या महिलेचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून यवत पोलीस अधिक तपास करीत आहे.