पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंदऋषीजी चौकात दुमजली उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यासाठी आणखी एक महिना कालावधी लागणार आहे. त्यामुळे नियोजित वेळेत ३१ मार्चपूर्वी उड्डाणपुलाचे काम काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. त्यामुळे औंध, बाणेर, पाषाण, बालेवाडीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आणखी एक महिना (एप्रिल) वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे काम ‘पीएमआरडीए’ने हाती घेतले आहे. या प्रकल्पासाठी विद्यापीठासमोरील आनंदऋषीजी चौकातील उड्डाणपूल २०२० मध्ये पाडण्यात आला.

त्या ठिकाणी दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. हे काम जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना ‘पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणा’च्या (पुम्टा) बैठकीत देण्यात आल्या होत्या. मात्र, चौकातील सेवावाहिन्या स्थलांतर करण्याचे काम महापालिकेकडून वेळेत पूर्ण झाले नाही. तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. म्हणून वाहतूक पोलिसांनी गणेशखिंड रस्त्यावर सुरक्षा (बॅरिकेडिंग) करण्यास ‘पीएमआरडीए’ला परवानगी दिली नव्हती. त्यामुळे या चौकातील काम सुरू होण्यास विलंब झाला.

गणेशखिंड रस्त्यावरील ‘ई-स्वेअर’ येथून हा पूल सुरू होतो. पुलासाठी ४२ खांब उभारण्यात येणार आहेत. मुख्य चौकात खांब उभारल्यास वाहतुकीला अडथळा निर्माण होईल म्हणून मुख्य चौकात एकही खांब न उभारता दोन खांबांमध्ये ५५ मीटर लांबीचे आणि सुमारे १८ ते २० मीटर रुंदीचे ‘स्पॅन’ टाकण्याचे प्रस्तावित आहे. उड्डाणपुलाचे काम २०२३ मध्ये सुरू झाल्यानंतर जानेवारी २०२४, त्यानंतर ऑगस्ट आणि त्यानंतर नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आणि त्यानंतर ३१ मार्च २०२५ ही मुदत देण्यात आली होती. मात्र, या मुदतीमध्येही काम पूर्ण झालेले नाही.

उड्डाणपुलाची एक बाजू महिनाभरानंतर सुरू झाल्यास येथून दररोज ये-जा करणाऱ्या पुणेकरांची वाहतूक समस्येतून काही प्रमाणात सुटका होण्याची शक्यता आहे.

उड्डाणपुलाचे काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत ‘पीएमआरडीए’चे उद्दिष्ट होते. मात्र, किरकोळ कामे प्रलंबित आहेत. एप्रिल महिना अखेरपर्यंत उड्डाणपुलाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात येईल. – रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए