शिक्षण, कुटुंब नियोजन आणि नाट्य-चित्रपटसृष्टी अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रात योगदान देणाऱ्या तीन पिढ्यांचे कर्तृत्व पाहण्याचे भाग्य लाभलेला परांजपे बंगला काळाच्या पडद्याआड गेला आहे. रँग्लर र. पु. परांजपे, शकुंतला परांजपे आणि सई परांजपे अशा तीन पिढ्यांचे वास्तव्य असलेला हा बंगला आता जमीनदोस्त करण्यास सुरुवात झाली आहे.
डेक्कन जिमखाना परिसरातील आपटे रस्त्यालगत रँग्लर परांजपे यांचा बंगला आहे. या बंगल्यावरूनच आपटे रस्ता ते फर्ग्युसन रस्ता जोडणाऱ्या रस्त्याचे रँग्लर परांजपे रस्ता असे नामकरण करण्यात आले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात या बंगल्याची उभारणी करण्यात आली होती. फर्ग्युसन महाविद्यालयात गणित विषयाचे अध्यापन करणारे डॉ. रघुनाथराव पुरुषोत्तम परांजपे या बंगल्यात १९३३ ते १९६६ या दरम्यान वास्तव्यास होते. ख्यातनाम समाजसेविका शकुंतला परांजपे आणि त्यांची कन्या, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या पिढ्यांचे वास्तव्य याच बंगल्यात होते.
हा बंगला मांजर बंगला म्हणूनही ओळखला जात होता –
याच वास्तूमधून शकुंतला परांजपे यांनी कुटुंब नियोजन क्षेत्रातील कार्याची सुरुवात केली होती. हा बंगला जीर्ण झाल्याने तो जमीनदोस्त करण्यास सुरुवात झाली आहे. शकुंतला परांजपे यांचे मार्जारप्रेम सर्वश्रुत होते. त्यांच्याकडे अनेक मांजरी होत्या. अनेक मांजरांचे वास्तव्य असलेला हा बंगला मांजर बंगला म्हणूनही ओळखला जात होता.
सई परांजपे यांचा या संदर्भात काही बोलण्यास नकार –
रँग्लर परांजपे अध्यापन करत असलेल्या संस्थेला म्हणजेच डेक्कन एज्युकेशन सोसायटीला ही जागा दान करण्यात आली असल्याची चर्चा आहे. मात्र, त्याला दुजोरा मिळू शकला नाही. यासंदर्भात सई परांजपे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काही बोलण्यास नकार दिला.