पुणे : जमिनीच्या वादातून चुलत मामाने धमकी दिल्याच्या रागातून बदला घेण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली. तरुणाला पिस्तूल देणाऱ्या एकाला अटक करण्यात आली.
आकाश बळीराम (वय २४, रा. नवशा मारुती मंदिराजवळ, सिंहगड रस्ता) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आरोपी आकाश याला पिस्तूल देणारा सुभाष बाळू मरगळे (वय २४, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक) यालाही अटक करण्यात आली. एरंडवणे भागातील डीपी रस्त्यावर आकाश थांबला होता. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर चित्ते यांना मिळाली. सापळा लावून पोलिसांनी आकाशला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले.
हेही वाचा – पुणे : कोंढव्यातील नताशा एनक्लेव्ह सोसायटीत आग, रहिवासी बाहेर पडल्याने बचावले
हेही वाचा – लष्करी अधिकारी असल्याच्या बतावणीने ज्येष्ठाची पाच लाखांची फसवणूक
आरोपी आकाशचे चुलत मामाबरोबर जमिनीच्या मालकीवरुन वाद झाले होते. मामाने आकाशला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्याने मामाचा बदला घेण्यासाठी सुभाष मरगळे याच्या मध्यस्थीने हडपसरमधील एकाकडून पिस्तूल विकत घेतल्याची कबुली पोलिसांना दिली. अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे,सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, ज्ञानेश्वर ढवळे, शरद वाकसे, संजीव कळंबे, सुजीत पवार, ज्ञानेश्वर चित्ते, गणेश शिंदे, सोनम नेवसे यांनी ही कामगिरी केली.