पुणे : आयुर्वेदात नाडी परीक्षा महत्त्वाची मानली जाते. निष्णात वैद्य अचूक नाडी परीक्षेद्वारे आजाराचे निदान करतात. अशी नाडी परीक्षा करणारे ‘नाडी तरंगिणी’ हे डिजिटल वैद्यकीय उपकरण पुण्यातील नवउद्यमीने विकसित केले आहे. या उपकरणाला केंद्रीय औषधे मानक नियंत्रण संस्थेने (सीडीएससीओ) मान्यता दिली आहे.

‘नाडी तरंगिणी’ची मूळ संकल्पना मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेचे कुलपती प्रा. जे. बी. जोशी यांची आहे. त्यांचे पुत्र डॉ. अनिरुद्ध जोशी यांनी हे डिजिटल नाडी परीक्षा उपकरण विकसित केले आहे. सीडीएससीओने प्रमाणित केलेले आयुर्वेदिक उपचार पद्धतीतील पहिले वैद्यकीय उपकरण ठरले आहे. या विषयी प्रो. जे. बी. जोशी म्हणाले, ‘दोन दशकांपूर्वी सुचलेल्या या संकल्पनेला आता खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याच्या वापरासाठी आता सरकारी मान्यताही मिळाली आहे. त्यामुळे आयुर्वेदिक उपचाराला एक नवीन दिशा मिळण्याबरोबरच आयुर्वेदाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी गरजेच्या असलेल्या प्रमाणीकरण प्रक्रियेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.’

हेही वाचा : पुणे : कर्वेनगर भागातील बंगल्यात चोरी

या उपकरणाच्या संशोधनप्रक्रियेविषयी बोलताना डॉ. अनिरुद्ध जोशी म्हणाले, की माझे वडील प्रो. जे. बी. जोशी यांना सुमारे २० वर्षांपूर्वी काही त्रास झाला असता, पुण्यातील वैद्य अशोक श्रीपाद भट यांनी त्यांचे यशस्वी पद्धतीने उपचार केले. यात नाडी परीक्षा महत्त्वाची ठरली. हे लक्षात आल्यावर आयुर्वेदातील निदान प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान असलेल्या नाडी परीक्षेसाठी सुयोग्य असे वैद्यकीय उपकरण विकसित करायला हवे अशी कल्पना त्यांना सुचली. या संकल्पनेवर मी आयआयटी, पवई येथे सुमारे सहा वर्षे संशोधन केले. मी सात ते १० वेगवेगळ्या सेन्सरवर काम केले आणि शेवटी पिझोइलेक्ट्रिक प्रेशर सेन्सरवर आधारित हाताच्या बोटाच्या स्पर्शज्ञानाच्या अगदी जवळपास जाणारे ‘नाडी तरंगिणी’ उपकरण तयार केले.

हेही वाचा : ‘महारेरा’चा दणका! पुण्यातील ४८७ गृहप्रकल्पांना स्थगिती

देशभरात १२५० आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये वापर

सध्या ‘नाडी तरंगिणी’चा उपयोग देशभरातील १२५० हून अधिक आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये होत असून, या उपकरणाद्वारे आजवर सुमारे ५ लाखांहून अधिक व्यक्तींची नाडी परीक्षा करण्यात आली आहे. ‘सीडीएससीओ’चे प्रमाणन करताना २५ हजार व्यक्तींची तपासणी करून अहवाल सादर केला गेला. ‘नाडी तरंगिणी’च्या माध्यातून नाडी परीक्षा केली असता, १० पानांचा व तब्बल २२ आयुर्वेदिक उपचारांच्या बाबींचा अंतर्भाव असलेला अहवाल मिळतो. हा अहवाल १० भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याची सोय या उपकरणात आहे. तसेच नाडी तरंगिणीची अचूकता ही ८५ टक्क्यांहून अधिक असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे डॉ. अनिरुद्ध जोशी यांनी नमूद केले.

Story img Loader