पुणे : तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना एनडीए रस्त्यावरील शिवणे परिसरात घडली. टोळक्याने वैमनस्यातून हा प्रकार केला. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली.

दिनेश विश्वकर्मा (वय २४, रा. शिवणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी राज अनिल ठाकूर (वय १९), ॲलेक्स अरुण अँथोनी (वय २४) , निखील ठाकूर (वय २२), प्रकाश प्रेमबुडा (वय २०), साहिल राजेंद्र वाघमारे (वय २१, सर्व रा. उत्तमनगर, एनडीए रस्ता) यांना अटक करण्यात आली. याबाबत विनाेद थापा (वय २३, रा. उत्तमनगर) याने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश प्रेमबुडा आणि दिनेश विश्वकर्मा मूळचे नेपाळचे आहेत. दोघांचे कुटुंबीय उत्तमनगर परिसरात वास्तव्यास आहेत. दीड महिन्यापूर्वी दोघांमध्ये वाद झाला. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास शिवणे परिसरातून निघालेल्या विश्वकर्माला आरोपी प्रेमबुडा आणि साथीदारांनी गाठले. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

गंभीर जखमी अवस्थेतील विश्वकर्माला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी दुपारी विश्वकर्माचा उपचारांदरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू झाला, अशी माहिती उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यानी दिली. पसार झालेल्या पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक खंदारे तपास करत आहेत.

शहरात दोन दिवसांत दोन खून

कोथरूड भागातील शास्त्रीनगर परिसरात वैमनस्यातून टोळक्याने तरुणावर तलवारीने वार करून खून केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. टोळक्याने तरुणावर पिस्तुलातून गोळीबार केला होता. त्यानंतर सोमवारी रात्री एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर परिसरात वैमनस्यातून दिनेश विश्वकर्मा या तरुणाचा खून झाल्याची घटना घडली. दोन दिवसांत दोन तरुणांचा वैमनस्यातून खून झाला.

Story img Loader