रेल्वेला वर्षांला जवळपास सातशे कोटी रुपये मिळवून देणाऱ्या पुण्याला रेल्वे अंदाजपत्रकात मात्र ठेंगा दाखविण्यात आला आहे. नव्याने सुरू होणाऱ्या दोन गाडय़ा पुणे मार्गे जाणार असल्याची बाब वगळता संपूर्ण अंदाजपत्रकात पुण्याचा उल्लेख नाही. त्याचप्रमाणे दररोज सुमारे दोन लाख प्रवाशांची ये-जा असलेल्या पुणे स्थानकातील विविध समस्या सोडविण्यासाठी त्याचप्रमाणे उपनगरीय रेल्वे वाहतूक मजबूत करण्यासाठी एकही योजना जाहीर झाली नाही. रेल्वे अंदाजपत्रकात सलग दुसऱ्या वर्षीही पुणे विभागाची निराशच झाली आहे.
रेल्वे मंत्र्यांनी मंगळवारी रेल्वेचे अंदाजपत्रक सादर केले. या संपूर्ण अंदाजपत्रकाने पुणेकरांची घोर निराशा केली. पुणे विभागातून रेल्वेला मोठय़ा प्रमाणात महसूल मिळतो. प्रवासी भाडय़ातून चारशेहून अधिक कोटी, तर माल वाहतुकीतून अडीचशे कोटी रुपयांहून अधिक रुपये मिळतात. ही जवळजवळ सातशे कोटी रुपयांची रक्कम पुणे विभाग दरवर्षी रेल्वेला देतो. ही बाब लक्षात घेण्याबरोबरच पुणे शहराची वाढती लोकसंख्या पाहता पुण्यासाठी अंदाजपत्रकात काही ठोस योजना अपेक्षित होत्या. मात्र, प्रत्यक्षात पुण्याला कोणत्याही नव्या गाडय़ा देण्यात आल्या नाहीत. त्याचप्रमाणे या महत्त्वाच्या स्थानकासाठी एकही योजना जाहीर झाली नसल्याने प्रवाशांची निराशाच झाली.
रेल्वे अंदाजपत्रकात जाहीर झालेल्या नव्या गाडय़ांपैकी दोन गाडय़ा पुणे मार्गे जाणाऱ्या आहेत. मुंबई-सोलापूर ही नवी गाडी आठवडय़ातून सहा दिवस धावणार आहे. त्याचप्रमाणे हुबळी-मुंबई ही गाडी आठवडय़ातून एकदा सोडण्यात येणार आहे. पुणे मार्गे जाणाऱ्या या गाडय़ांबरोबरच मुंबई-लातूर ही गाडी आता नांदेडपर्यंत सोडण्यात येईल. याखेरीज दौंड-मनमाड या मार्गाच्या दुहेरीकरणाबाबत पुन्हा आढावा घेण्यात येणार असून, सासवड-जेजुरी या नव्या मार्गाचेही सर्वेक्षण करण्यात येणार आहे. रेल्वेच्या पुणे विभागातील या गोष्टी वगळता पुणे शहर व परिसर डोळ्यासमोर ठेवून कोणतीही ठोस उपाययोजना नाही.
पुणे स्थानक आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याची घोषणा तीन वर्षांपूर्वी करण्यात आली. यंदाच्या रेल्वे अंदाजपत्रकातही त्याबाबत कोणताही उल्लेख नाही. पुणे-लोणावळा उपनगरीय रेल्वे सेवेत वाढ करणे, त्यासाठी स्वतंत्र टर्मिनन्स करणे, पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या गाडय़ांबरोबरच पुण्यातून कोल्हापूर, नांदेड, सोलापूर परभणी, बीड आदी भागातील गाडय़ा सुरू करण्याची मोठी मागणी आहे. चेन्नई, बंगळुरू, जयपूर त्याचप्रमाणे कोकणमार्गे पुण्यातून गाडय़ा सोडण्याविषयीही अनेक दिवसांपासून मागणी करण्यात येत आहे. सध्या सुरू असलेल्या दुरांतो गाडय़ांबरोबरच इतर गाडय़ांच्या फेऱ्या वाढविण्याचीही जोरदार मागणी आहे. मात्र नव्या गाडय़ा तर नाहीत, पण आहे त्या गाडय़ांच्या फेऱ्या वाढविण्याची मागणीही पूर्ण होऊ शकलेली नाही. याबाबत प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दुरांतोसह डेक्कन, इंद्रायणीची भाडेवाढ
रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांनी मांडलेल्या रेल्वे अंदाजपत्रकात रेल्वेच्या भाडय़ामध्ये प्रत्यक्षात वाढ केली नसली तरी सुपरफास्ट रेल्वेगाडय़ा व इंधनावरील अधिभार वाढवून त्याचप्रमाणे आरक्षण करण्यासह ते रद्द करण्याचे दर वाढविल्याने भाडेवाढ होणार आहे. त्यामुळे पुण्यातून सोडल्या जाणाऱ्या अहमदाबाद, दिल्ली व हावडा या दुरांतो गाडय़ांसह डेक्कन व इंद्रायणी या गाडय़ांची भाडेवाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरक्षणाच्या दरांमध्ये विविध वर्गानुसार १५ ते १०० रुपयांची वाढ अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे आरक्षण रद्द करण्याचे दर २० ते ५० रुपयांनी वाढणार आहेत.