संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांच्या वास्तव्याने गेले दोन दिवस शहरात भक्तिचैतन्याचा संचार झाला. एकीकडे वैष्णवांचा भक्तिभाव सुरू असताना वारकऱ्यांची विविध प्रकारे सेवा करून पुणेकरांनी या भक्तिभावाला सेवाभावाची जोड दिली.
माउली व तुकोबांच्या पालख्या सोमवारी शहरात आल्यापासून टाळ-मृदंगांचा गजर अन् अभंगांच्या सुरावटींनी शहरातील वातावरणच बदलून गेले होते. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरामधील माउलींच्या पालखी मुक्कामी, तर नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरातील तुकोबांच्या पालखी मुक्कामी रात्री कीर्तनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे दैनंदिन पूजा, आरती झाल्यानंतर पादुकांचे दर्शन सुरू करण्यात आले. पादुकांच्या दर्शनाचे भाग्य मिळविण्यासाठी पहाटेपासूनच मुक्कामाच्या ठिकाणी भाविकांची गर्दी झाली होती. सकाळपर्यंत भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भवानी पेठ व नाना पेठेच्या मुक्कामाच्या भागाला जत्रेचे स्वरूप आले होते. रात्री उशिरापर्यंत पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी कायम होती.
एकीकडे पादुकांचे दर्शन घेत असतानाच दुसरीकडे वारकऱ्यांसाठी विविध सेवा देण्यासाठी पुणेकरांकडून पुढाकार घेण्यात येत होता. घराघरांत वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे रस्त्यावर अनेक ठिकाणी विविध संस्था व संघटनांच्या वतीने वारकऱ्यांना विविध सेवा देण्यात येत होत्या.
——– वारकऱ्यांसाठी विविध सेवा
पुणे जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कमलताई व्यवहारे यांच्या हस्ते काँग्रेस भवन येथे फराळाचे वाटप करण्यात आले. काँग्रेसच्या कॅन्टोन्मेंट कमिटीचे सरचिटणीस आयाज पठाण यांच्या वतीने फराळ व फळांचे वाटप करण्यात आले. शिवसेनेच्या कसबा विभागाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे शिवसेनेचे उपनेते अरिवद सावंत यांच्या हस्ते वारकऱ्यांना इरलीचे वाटप करण्यात आले. फुले-साठे-आंबेडकर विचार फाउंडेशन व लहुजी समता परिषदेच्या बोपोडी व खैरेवाडी शाखेच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले. घोरपडी पेठ शाखेच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. नाना पेठेतील शिवशक्ती तरुण मंडळाच्या वतीने वारकऱ्यांसाठी विविध सेवा देण्यात आल्या. भोजनाची व्यवस्था करण्याबरोबरच मोफत औषधोपचार, दाढी-कटिंग आदींचीही व्यवस्था करण्यात आली.
शनिवार पेठेतील न्यू इंडियन क्रिकेट क्लब, बिबवेवाडी येथील प्रियदर्शनी महिला मंडळ, संत रामदास विद्यालयामध्ये गणराज प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. शिवसेनेच्या शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाच्या वतीने गुडदाणीचे वाटप करण्यात आले. कसबा पेठेतील वीर मित्र मंडळाच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले. या वेळी यशवंत महाराज काठोळे यांचे प्रवचन झाले. श्री संताजी सेना संस्थेच्या वतीने वाकऱ्यांसाठी चहा, बिस्किटाची व्यवस्था करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस व धीरज बाळासाहेब आरगडे मित्र परिवाराच्या वतीने माजी आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. त्याचप्रमाणे छत्र्यांचे वाटप करण्यात आले. नारायण पेठेतील योगेश तिवारी मित्र परिवार व श्री विनायक मित्र मंडळाच्या वतीने मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अनिल अगावणे संचालित पुणे महानगर पालिका सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने वारकऱ्यांसाठी वृत्तपत्र व अल्पोपाहार वाटप उपक्रम राबविण्यात आला.
——– वारकऱ्यांसाठी पायाचा मसाज
संत ज्ञानेश्वरमहाराजांचा पालखी सोहळा पुण्याहून सासवडच्या दिशेने जात असताना बुधवारी योग विद्या धामच्या वतीने वारकऱ्यांसाठी पायाचा मसाज देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सासवड रस्त्यावरील झेंडीवाडी येथील हॉटेल सवाई येथे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
——– स्वच्छता दिंडीची सुरुवात
राज्याचा ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यामध्ये स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या दिंडीची सुरुवात बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
पालख्यांसाठी सोलापूर रस्त्यावरील वाहतुकीत बदल
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या बुधवारी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. त्यामुळे पहाटे पाच वाजल्यापासून पालखीमार्गावरील वाहतूक टप्प्या-टप्प्याने बंद केली जाणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
संत तुकाराम महाराजांची पालखी निवडुंगा विठोबा मंदिर येथून अरुणा चौक, भवानी माता मंदिर, पूलगेट चौकीपासून सोलापूर रस्त्याने हडपसर गाडी तळावरून लोणीकाळभोर मार्गे जाणार आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पालखी विठोबा मंदिर येथून भवानी पेठ, रामोशी गेट, भवानी माता मंदिर, पूलगेट पोलीस चौकी येथून सोलापूर रस्त्याने हडपसर गाडीतळ पासून वळून सासवडमार्गे जाणार आहे. पालखी काळात या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. बुधवारी शहरात येणाऱ्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली. मुंबईकडून नगरकडे जाणाऱ्यांनी तळेगाव येथून चाकण, शिक्रापूरमार्गे अहमदनगरकडे जावे. सासवडकडून मुंबईकडे जाणाऱ्यांनी कात्रज बायपासचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.