देणाऱ्याचे हात हजारो..!
समाजातील विधायक कामाच्या पाठीशी समर्थपणे उभे राहणे हा पुणेकरांचा गुण असल्याचा अनुभव सुनील आणि डॉ. निरुपमा देशपांडे दाम्पत्याला आला . त्यांच्या कार्यासाठी सहा लाख रुपयांचा निधी आणि सुस्थितीतील ट्रकभरून कपडे देत पुणेकरांनी दातृत्वाचा प्रत्यय दिला.
मेळघाट आणि कुपोषण हे समीकरण सर्वानाच माहीत आहे. किंबहुना कुपोषित मेळघाट अशीच ओळख प्रस्थापित झाली आहे. परंतु, तेथेही स्वयंरोजगाराच्या संधी आहेत. मोठय़ा प्रमाणावर तेथे तयार होणाऱ्या बांबूंपासून विविध वस्तू करण्याचे कौशल्य तेथील स्थानिक लोकांकडे आहे. याचा अभ्यास करून सुनील आणि डॉ. निरुपमा देशपांडे हे दाम्पत्य २१ वर्षांपूर्वी नागपूर येथून मेळघाट येथे गेले. मेळघाट हीच कर्मभूमी मानून तेथेच पूर्णवेळ काम करण्यामध्ये देशपांडे यांनी आनंद मानला. सुनील देशपांडे यांनी ‘संपूर्ण बांबू केंद्र’ या संस्थेच्या माध्यमातून बांबूची लागवड, संशोधन, नवनवीन वस्तूंच्या डिझाईनसह बांबूची घरे बांधणे असे विविध उपक्रम राबविले. त्यासाठी वनवासी जनजातीतील चारशे तरुणांना प्रशिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे करण्याचे महत्त्वपूर्ण कामही त्यांनी केले आहे. डॉ. निरुपमा देशपांडे यांनी मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यांमध्ये ६३ ठिकाणी २५० स्वयंसहायता बचत गट चालवून वनवासी महिलांची सावकारी पाशातून मुक्तता केली आहे. महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणाचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला आहे.
‘देशपांडे दाम्पत्याच्या महत्त्वपूर्ण कामासाठी मेळघाट सपोर्ट ग्रुपतर्फे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात पुणेकरांनी सहा लाख रुपयांचा निधी देशपांडे दाम्पत्याकडे सुपूर्द केला. या निमित्ताने भरवण्यात आलेल्या प्रदर्शनात ४५ हजार रुपये किमतीच्या बांबूच्या विविध वस्तूंची खरेदीही पुणेकरांनी केली आणि सुस्थितीतील ट्रकभर कपडे देऊन आपल्या उदारपणाची प्रचिती दिली,’ अशी माहिती मेळघाट सपोर्ट ग्रुपचे स्थापनेपासूनचे कार्यकर्ते सुनील भंडगे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा