भक्ती बिसुरे, पुणे

मेंदूतील डोपामाईन या द्रवाचे प्रमाण कमी झाल्याने, शरीरात शिरकाव करून हळूहळू संपूर्ण शरीराचा ताबा घेणारा कंपवात (पार्किन्सन्स) हा आजार रुग्णाला अंथरुणाला खिळवतो. हा आजार कधीही पूर्ण बरा होत नाही. त्यामुळे त्याच्याबाबत धास्ती आहे. मात्र, पुण्यात अनेक कंपवाताचे रुग्ण नृत्याचे धडे गिरवत या आजाराशी दोन हात करत असलेले दिसून येत आहेत.

कथक आणि समकालीन नृत्याचे अभ्यासक आणि नृत्य दिग्दर्शक हृषीकेश पवार हे कंपवाताच्या रुग्णांना नृत्याचे मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना आजाराकडे सकारात्मकपणे पाहण्याची दृष्टी देत आहेत. कंपवातामुळे आखडत चाललेल्या शरीराला मोकळे ढाकळे करण्यासाठी, पुरेसा व्यायाम मिळवण्यासाठी तसेच रुग्णाचे मन आनंदी आणि सकारात्मक ठेवण्यासाठी हृषीकेश यांचे नृत्याचे धडे उपयुक्त ठरत आहेत.

हृषीकेश पवार म्हणाले की, गेली नऊ वर्षे कंपवाताच्या विविध वयोगटातील रुग्णांना नृत्य शिकवतो, प्रत्यक्षात हे शिक्षण उपचारांचे काम करत असले तरी मी याला ‘थेरपी’ किंवा उपचार म्हणत नाही. कोणत्याही सर्वसामान्य विद्यार्थ्यांला शिकवण्याची पद्धत आणि कंपवाताच्या रुग्णांना शिकवण्याची पद्धत यात फरक केला जात नाही. व्यक्तीमध्ये सकारात्मकता आणि आनंद निर्माण करणे हे नृत्याचे वैशिष्टय़ आहे. नृत्य करून बरे वाटले हे ढोबळ विधान झाले, मात्र नृत्यामुळे रुग्णाच्या हालचालींमध्ये, मानसिक तसेच शारीरिक स्थितीमध्ये काय फरक पडला याचा शास्त्रोक्त अभ्यास करत रुग्णाला नृत्य शिकवले जाते. सत्त्याऐंशी वर्षांचे आजोबा गेली सात वर्षे नृत्य शिकायला येतात. आठवडय़ातून तीन दिवस शहराच्या कानाकोपऱ्यातून, अनेकदा शहराबाहेरून देखील कंपवाताचे रुग्ण नृत्य शिकण्यासाठी येतात. दिल्ली, बंगळूरु, मुंबई येथील रुग्ण येथे येऊन, नृत्य शिकून आपल्या शहरातील रुग्णांसाठी हा उपक्रम सुरू करतात, यातून त्याचा सकारात्मक परिणाम स्पष्ट होतो.

‘पार्किन्सन्स सपोर्ट ग्रुप’ च्या अंजली महाजन म्हणाल्या,की कंपवात हा मेंदूचा आजार असल्याने या आजाराच्या रुग्णांवर उपचार करणे हे आव्हानात्मक असते. डोपामाईन हा द्रव कमी झाल्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि कंपवाताची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. हा आजार संपूर्ण बरा होणारा नाही, त्यामुळे वयपरत्वे तो वाढून रुग्ण अंथरुणाला खिळण्याची शक्यता असते. प्राथमिक स्तरातील कंपवातावर उपचार म्हणून नृत्याचे धडे घेण्यास सुरुवात केली असता त्या रुग्णांवर त्याचे सकारात्मक परिणाम दिसतात.

मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. राहुल कुलकर्णी म्हणाले,की कोणत्याही स्वरूपाचा व्यायाम नियमितपणे केल्यास त्याचा उपयोग कंपवाताच्या रुग्णांमध्ये दिसतो. नृत्य, योगासने, चालणे किंवा रुग्णाच्या सवयीच्या असलेल्या कोणत्याही व्यायामाचा उपयोग होतो. नियमित व्यायाम केल्याने त्याचा परिणाम रुग्णांचा आजार नियंत्रणात राहाण्यासाठी होतो. मात्र, हा व्यायाम कष्टप्रद नसावा, तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने केला जावा.

Story img Loader