पुणे : स्थानकावर पोहोचण्यास उशीर झाला किंवा थांबा नसलेल्या ठिकाणी मध्येच उतरायचे आहे, अशा किरकोळ कारणांसाठी रेल्वे गाड्यांमधील आपत्कालीन साखळी ओढून रेल्वे गाडी थांबविण्याच्या प्रकारांमध्ये पुणे रेल्वेत वाढ झाली आहे. रेल्वे पोलिसांनी याबाबत कठोर भूमिका घेतली असून, गेल्या आठ महिन्यांमध्ये अशा घटनांमध्ये ७७३ जणांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा <<< Maharashtra News Live : महाराष्ट्रातील विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर

हेही वाचा <<< ‘बेकायदा शाळा चालवणाऱ्या संचालकांवर कारवाई करा’; पालिका आयुक्तांकडे मागणी

गाडीमध्ये प्रवाशांची सुरक्षा धोक्यात असेल अशा प्रकारची स्थिती त्याचप्रमाणे इतर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास रेल्वे गाडी थांबविण्याच्या दृष्टीने प्रवासी गाडीतील साखळीचा (अलार्म चेन पुलिंग) वापर करू शकतात. प्रवाशांनी ही साखळी ओढल्यास आपत्कालीन स्थिती असल्याचे समजून गाडीच्या चालकाकडून तातडीने गाडी थांबविण्यात येते. मात्र, आपत्कालीन परिस्थितीसाठी असलेल्या या व्यवस्थेचा वापर प्रवासी कोणत्याही किरकोळ आणि वैयक्तिक कामांसाठी करीत असल्याचे प्रकार पुणे रेल्वेमध्ये वाढले आहेत. त्यामुळे अशा प्रकारांत आता कठोर कारवाई केली जात आहे.

हेही वाचा <<< “वेदान्तच्या जागी दुसरा प्रकल्प देऊ म्हणणं म्हणजे…”; सुप्रिया सुळे यांचा केंद्रावर निशाणा

मध्य रेल्वेच्या पुणे विभागामध्ये या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत अनावश्यक कारणांसाठी साखळी ओढून रेल्वे थांबविण्याचे तब्बल ९६० प्रकार घडले आहेत. त्यात ७७३ जणांना अटक करण्यात आली आहे. अनावश्यक कामांसाठी साखळी ओढण्याच्या प्रकारांमुळे संबंधित गाडीला विलंब होतो. त्यामुळे इतर गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम होत असतो. वैयक्तिक कारणांसाठी साखळी ओढून गाडी थांबविल्याने इतर प्रवाशांचाही खोळंबा होतो. त्यामुळे किरकोळ कारणांसाठी आपत्कालीन यंत्रणेतून कुणीही गाडी थांबविण्याचा प्रयत्न करू नये. प्रवाशांनी गाडी सुटण्यापूर्वी ३० मिनिटे आधी स्थानकावर पोहोचावे, असे आवाहन पुणे रेल्वेकडून करण्यात आले आहे.