पुणे : कुटुंबाच्या सांपत्तिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेले ‘वेल्थ चेकअप’ आणि आपल्या पश्चात संपत्तीचा योग्य विनियोग होण्यासाठी गरजेचे असलेले ‘इच्छापत्र’ (विल) यासंबंधीची परिपूर्ण माहिती जाणून घेण्याची संधी पुणेकरांना शनिवारी मिळाली. यासाठी निमित्त होते ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’च्या प्रकाशनानिमित्त योजण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमाचे.
सर्वांसाठी ‘गुंतवणूक-संकल्प’ ठरत आलेल्या ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ या वार्षिक विशेषांकाच्या १२ व्या अंकाचे प्रकाशन पुण्यात शनिवारी झाले. एक एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षासाठी गुंतवणूकदारांना सजग आणि सज्ज करणाऱ्या या विशेषांकाच्या प्रकाशनानिमित्त योजण्यात आलेल्या या कार्यक्रमात, कुटुंबाच्या सांपत्तिक आरोग्याची काळजी म्हणून आवश्यक असलेल्या ‘वेल्थ चेकअप’ची संधीही सर्वांसाठी खुली झाली. आपले आर्थिक आरोग्य तपासून त्यानुसार गुंतवणूक कशी करायची, तसेच ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी कोणती दक्षता घ्यायची, याचा सल्ला या कार्यक्रमात सनदी लेखापाल व वित्तीय नियोजनकार रेखा धामणकर यांनी दिला. अर्थसंकलन, अर्थसंचय, अर्थविनियोग यासह अर्थसाक्षरतेबाबतही त्यांनी श्रोत्यांना मार्गदर्शन केले.
जीवनात जे काही कमावले त्याचे आपल्यानंतर काय होईल, हे प्रत्येकानेच वेळ निघून जाण्याआधीच पाहिले पाहिजे. त्यासाठी आवश्यक असलेले साधे-सोपे दस्त म्हणजेच ‘इच्छापत्र’ (विल) कसे करता येईल, ते कोणी करावे, कोणत्या वयात व कसे करावे, याची माहिती उदाहरणांसह सनदी लेखापाल आणि कर सल्लागार दीपक टिकेकर यांनी दिली. याचबरोबर नवीन करसुधारणा आणि कर दरांबाबतही त्यांनी मांडणी केली.
आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचे शैलेंद्र दीक्षित, विभागीय प्रमुख (उर्वरित महाराष्ट्र व गोवा) मधुरा कौशिक, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेडचे विजय परदेशी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘लोकसत्ता’ पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सिद्धार्थ केळकर यांनी केले. सुनील वालावलकर यांनी सूत्रसंचालन केले.
मुख्य प्रायोजक : आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड
सहप्रायोजक : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड
पॉवर्ड बाय : नेमिनाथ ज्वेलर्स आणि टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड