पुणे : कवितांचा जागर करून ज्येष्ठ कवी नामदेव ढसाळ यांच्या साहित्यिक कर्तृत्वाला कवींनी मंगळवारी अभिवादन तर केलेच, पण अवमानकारक उल्लेख करणाऱ्या सेन्साॅर बोर्डाविरोधात अभिनव आंदोलन करून ढसाळ यांच्या वाङ्मयीन कार्याला उजाळा दिला. नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील कलाकार कट्टा येथे ‘नामदेव तुझा बाप’ या अभिनव आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ कवी-गज़लकार म. भा. चव्हाण, कवी नितीन चंदनशिवे, सम्यक साहित्य संमेलनाच्या आयोजक समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, आनंद करंदीकर, सुमित गुणवंत, सागर काकडे, हृदयमानव अशोक, अशोक घोडके, रोहित पेटारे ऊर्फ मिर्झा संतोष सखंद, दीपक म्हस्के, कुमार आहेर, स्वप्नील चोधरी, हर्षानंद सोनवणे, रवी कांबळे, विठ्ठल गायकवाड यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
‘भाऊच्या धक्क्याला सागरी लाटा टकरा देत आहेत, जरा बंद करशील का तुझा तो गेट वे ऑफ इंडिया’ ही ढसाळ यांची कविता, बर्लिन लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये ढसाळ यांनी सादर केलेला ‘डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी’ हा संत जनाबाई यांचा अभंग अशा आठवणींना उजाळा देण्यात आला.
बहुजनांचे अग्रदूत असलेले ढसाळ हे जागतिक साहित्यिक होते. त्यामुळे त्यांना जातीमध्ये बंदिस्त करणे योग्य होणार नाही, असे सांगून चव्हाण यांनी, ‘ज्यांना सेन्सच नाही असले सेन्साॅर बोर्ड काय कामाचे?’ असा सवाल उपस्थित केला.चंदनशिवे म्हणाले, ‘मराठी साहित्याला बोंबलायची सवय ढसाळ यांनी लावली. मात्र, हेडफोन लावणाऱ्या पिढीला तो बोंबलण्याचा आवाजच ऐकायला येत नाही.’
नामदेव ढसाळ यांच्या कवितांपेक्षाही सध्याच्या चित्रपटांमध्ये असलेले आक्षेपार्ह चित्रीकरण सेन्सॉर बोर्डाला दिसत नाही. शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाच्या व्यथा-वेदना मांडताना शिव्यांचा वापर करणाऱ्या ढसाळ यांनी लेखणणीद्वारे फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार अधोरेखित केले. ‘पद्मश्री’ने गौरविलेल्या सरकारच्याच सेन्साॅर बोर्डाला ढसाळ कोण, असा पडणारा प्रश्न वेदनादायी आहे.- परशुराम वाडेकर, संयोजक, सम्यक साहित्य संमेलन,