सुधीर गाडगीळ
Loksatta Pune Vardhapan 2023 : पूर्वी भांग्या-पत्र्या-सोन्या मारुती, मुरलीधराला खुन्या म्हणत अशी चित्रविचित्र नावं असलेल्या देवदेवतांच्या देवळांमधून नामा म्हणे, तुका म्हणे, असं म्हणत, कीर्तनकार- प्रवचनकार नेमके शब्द मांडत निरुपण करत. त्यातून ‘शब्द’ बोलणं याचं महत्त्व वाढत गेलं. पुढे शब्द मांडणीची जागा जाहीर व्याख्यानांनी घेतली. ‘शनिवार वाडा’ हे वक्तव्याचं आद्य स्थळ होतं. पुढे वसंत व्याख्यानमाला ते मॅजेस्टिक गप्पा अशा व्याख्यान सत्रामध्ये भाषणबाजी सुरू झाली. आणि त्या त्या ठिकाणी वक्तृत्वाच्या छटा अनुभवायला आणि वक्त्यांना दाद द्यायला पुणेकर हजेरी लावू लागले.
हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : पुणे व्हावे ‘ई-सिटी’!
‘सुरां’ची ओढ घरोघरी. अनेक पिढ्यांची. हिराबाई बडोदेकर, ज्योत्स्ना भोळे, माणिक वर्मा, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे ते अलीकडच्या आरती अंकलीकरपर्यंत अनेकांच्या मैफिलींना दाद मिळत गेली. यात शास्त्रीय, उपशास्त्रीय, नाट्यसंगीत- भावसंगीत अशा गाण्यांच्या सर्व छटा, वाटवे, मालती पांडे, आशा खाडीलकर अशा अनेक गायकांकडून ऐकण्यासाठी पुणेकर आवर्जून मैफिलींना एकवटू लागले. चित्रपट संगीताचंही वावडं नव्हतं. माडगूळकर-फडके यांच्या चित्रपट गीतांचे चैत्रबनसारखे कार्यक्रम नव्या पिढीनेही हजारभर प्रयोग करत सादर केले. तर हिन्दी चित्रपट संगीताचे ‘मेलडी मेकर्स’ सारखे ऑर्केस्ट्रा पुणेकरांनीच उचलून धरले. लता-आशा दीदींची गाणी थेट त्यांच्याच तोंडून प्रत्यक्ष ऐकण्याचं भाग्य पुणेकरांना मिळालं, तर त्यांच्या चित्रपटगीतांच्या स्पर्धा आयोजित करत अगदी आताच्या ताज्या पिढीतल्या पुणेकर रसिकांनी फिल्मी गाण्यांचीही गोडी चाखली. मात्तबर चित्रकारांची स्केचेस ते व्यक्तिचित्र, ते हास्य-व्यंगचित्र यांना दाद देणारी प्रदर्शनं पुण्यात कायम आयोजित केली गेली. तर अभिनव कलासारख्या चित्रकला महाविद्यालयातून नवे चित्रकार पुण्यात घडत गेले. जाता जाता नोंदवतो की हेड टॉकसारख्या लेटेस्ट गोष्टीतून नामवंत वक्त्यांचं मार्गदर्शन घेतलं गेलं. तर ‘खाद्य संस्कृती’ चं कल्चरही पुणेकरांनी जोपासलं. घरातल्या स्वयंपाकघरात आई-आजी-पत्नी यांनी केलेल्या पदार्थांपलीकडे जाऊन गावोगावच्या बदलत्या अभिरुचीचे पदार्थ खिलवण्याची आवड वाढत गेली.
हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : डिजिटल पुणे २०२५
गाणं, खाणं, बोलणं यात रस घेता घेता आता तर महत्त्वाच्या चौकांमध्ये कलावंतांचे अधिकृत कट्टेच निर्माण झालेत. फराळाचं खाणं आणि मोजके फटाके उडवणं, एवढ्यापुरती दिवाळी होती, आता पहाट दिवाळीसारखे विशेष कार्यक्रम पुण्यात आयोजित होऊ लागले. आणि त्यातून गाणं, बोलणं यालाच महत्त्व देत श्रोत्यांची दाद घेत दिवाळी साजरी करणारे कलावंतांचे ‘शो’ वाढले.
हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : नव्या पुण्यासाठी द्रष्टे सुनियोजन व अंमलबजावणीची गरज…
लग्न कार्यालयांपुरतं मर्यादित न राहता त्या निमित्तानेही गाण्यांचे कार्यक्रम मोठ्या स्टेजवरून लग्न सोहळ्यात होऊ लागले. वास्तुशांती आणि वाढदिवस हे देखील व्यक्तिगत न राहता, कलावंतांची उपस्थिती आणि कार्यक्रम तिथेही दिसू लागले. आणि या अगदी वैयक्तिक कार्यक्रमांना सार्वजनिक रूप आलं. कलावंतांचं हे बहूआयामी दर्शन विविध कार्यक्रमांतून घडू लागल्याने पुण्यातल्या बदलत्या सांस्कृतिक स्वरूपात, दरबारात कलावंतांचा व्यवसाय वाढत गेला. आणि त्याच्या आठवणी कायम जपण्यासाठी साऱ्या ‘शो’चं चित्रीकरण होत, कार्यक्रम दृक-श्राव्य स्वरूपात जपले जाऊ लागले.
सुधीर गाडगीळ
sudhirggadgil@gmail.com