पुणे : यंदा दिवाळीच्या काळात पुण्यातील हवा विषारी बनल्याचे समोर आले आहे. दिवाळीच्या कालावधीत हवेची प्रदूषण पातळी अनेक पटींनी वाढल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीतून निदर्शनास आले आहे. फटाक्यांमुळे हवेतील प्रदूषकांचे प्रमाण कमाल मर्यादा पातळीपेक्षा जास्त आढळून आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरात काही ठिकाणी दिवाळीच्या काळातील हवा प्रदूषणाची तपासणी केली. त्यात ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते १ नोव्हेंबर दुपारी १२ आणि १ नोव्हेंबर दुपारी १२ ते २ नोव्हेंबर दुपारी १२ अशा दोन दिवसांचा समावेश आहे. यातील पहिल्या दिवशी नरक चतुर्दशी होती, तर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन होते. सर्वसाधारणपणे शहरात लक्ष्मीपूजनापासून फटाके मोठ्या प्रमाणात वाजविण्यास सुरुवात होते. त्यामुळे फटाके वाजविण्यास सुरू होण्याआधीचा कालावधी आणि सुरुवात झाल्यानंतरचा कालावधी अशी तुलनात्मक आकडेवारी मंडळाने दिली आहे.

आणखी वाचा-अजितदादा लाखांच्या मताधिक्यानी निवडून येतील – रुपाली चाकणकर

शहरात शनिवारवाडा परिसरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवा प्रदूषणाची तपासणी केली. त्यात पहिल्या दिवशी पीएम १० या सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण सरासरी १३५.१९ होते. हेच प्रमाण दुसऱ्या दिवशी वाढून तब्बल ३९५.९६ वर पोहोचले. दुसऱ्या दिवशी रात्री १२ वाजता हे प्रमाण १ हजार ५९९ या उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. तसेच, पीएम २.५ या सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण पहिल्या दिवशी ५१.३२ होते; ते दुसऱ्या दिवशी १४० वर गेले. हे प्रमाण दुसऱ्या दिवशी रात्री १२ वाजता ५४९ वर गेले होते. सल्फर डाय ऑक्साईडचे प्रमाण पहिल्या दिवशी १३.७६ होते आणि दुसऱ्या दिवशी १७.२० नोंदविण्यात आले. हे प्रमाण दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजता २८.०५ वर पोहोचले होते.

आणखी वाचा-पिंपरीत सकाळच्या टप्यात मतदानाला अल्प प्रतिसाद; वाचा पहिल्या चार तासात किती मतदान?

दिवाळीतील प्रदूषण पातळी (मायक्रोग्रॅम्स प्रति घनमीटर)

प्रदूषक मर्यादा पातळीदिवाळीतील सरासरी पातळीहवेची गुणवत्ता
पीएम १०० ते ५०३९५ अतिखराब
पीएम २.५० ते ३०१४० अतिखराब
नायट्रोजन ऑक्साईड० ते २१४४ मध्यम
सल्फर डायऑक्साईड० ते ४०१७ चांगली
ओझोन ० ते २५३० समाधानकारक
कार्बन मोनॉक्साईड० ते ०.९१.२५समाधानकारक

आरोग्यावर गंभीर परिणाम

हवेतील प्रदूषकांचे गंभीर परिणाम आरोग्यावर होतात. हे प्रदूषक फुफ्फुसांमध्ये जाऊन तेथून पुढे रक्तात मिसळतात. त्यानंतर ते शरीरातील अवयवांपर्यंत पोहोचून पेशी आणि ऊतींना हानी पोहोचवितात. हवा प्रदूषणामुळे हृदयविकाराच्या झटक्यासह ब्रेन स्ट्रोक, सीओपीडी, फुफ्फुसाचा कर्करोग यासह अनेक गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी मास्कचा वापर करावा, असा सल्ला ससून सर्वोपचार रुग्णालयातील श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. संजय गायकवाड यांनी दिला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punes air is toxic during diwali shocking findings in maharashtra pollution control boards inspection pune print news stj 05 mrj