पुणे: पुणे रेल्वे स्थानकातील ब्रिटिशकालीन पादचारी पूल पुन्हा एकदा प्रवाशांसाठी खुला झाला आहे. करोना संकटानंतर २०२० मध्ये बंद करण्यात आलेला हा पूल दुरूस्ती व इतर सुधारणा करून पुन्हा सुरू करण्यात आला आहे. हा पूल सर्व फलाटांना जोडणारा असल्याने प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पादचारी पूल २०१९ मध्ये कोसळला होता. या दुर्घटनेनंतर सर्वच रेल्वे स्थानकांतील जुन्या पादचारी पुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला होता. यातील अनेक पूल हे ब्रिटिशकालीन असल्याने त्यांची तपासणी करण्यात आले. पुणे रेल्वे स्थानकातील जुना पादचारी पूलही ब्रिटिशकालीन असल्याने त्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत पुलाचे खांब आणि काही गंजलेल्या अवस्थेत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे २०२० मध्ये हा पूल पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला होता.
आणखी वाचा-आरटीओचा उलटा कारभार! शाळा सुरू झाल्यानंतर स्कूल बस तपासणीचा मुहूर्त
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात या पुलाची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यावेळी दुरूस्ती केल्यास हा पूल पुन्हा सुरू करता येईल, असे समोर आले. त्यामुळे या पुलाच्या गंजलेल्या खांबांची दुरूस्ती करून त्यांना भक्कम करण्यात आले. याचबरोबर पुलावरील प्रवाशांची संख्या मर्यादित राहावी, यासाठी त्याची रूंदी कमी करण्यात आली. आधी या पुलाची रुंदी ४.६ मीटर होती. दोन्ही बाजूंना पत्रे लावून या पुलाची रूंदी ३ मीटर करण्यात आली आहे. यानंतर हा पूल केवळ दिव्यांगांसाठी सुरू करण्यात आला. आता हा सर्व प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे.
जुना पादचारी पूल हा सर्व फलाटांना जोडणारा असल्याने प्रवाशांसाठी सोईचा ठरत होता. तो सुरू करावा, अशी मागणी केली जात होती. हा पूल दुरूस्तीनंतर आता प्रवाशांसाठी खुला झाला आहे. -डॉ. रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग, मध्य रेल्वे