पुणे : पुण्यातील लष्कर भागातील ‘बर्गर किंग’कडून अमेरिकेतील बर्गर किंग काॅर्पोरेशच्या व्यापरचिन्ह, तसेच नावाचा गैरवापर करण्यात आला नाही. बर्गर किंग कायदेशीर आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करत असल्याचे निरीक्षण न्यायालायने नोंदवून बर्गर किंग काॅर्पोरेशनने दाखल केलेला दावा निकाली काढला. लष्कर भागातील बर्गर किंगने अमेरिकेतील बर्गर किंग काॅर्पोरेशनविरुद्ध गेले १३ वर्षे सुरू असलेली न्यायालयीन लढाई जिंकली.
समान नावावरुन लष्कर भागातील बर्गर किंग आणि अमेरिकेतील बर्गर किंग काॅर्पोरेशन यांच्यात वाद होता. अमेरिकेतील बर्गर किंग काॅर्पोरेशनने दाखल केलेल्या खटल्यात जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी बर्गर किंगच्या बाजूने निकाल दिला. अमेरिकेच्या बर्गर किंग कॉर्पोरेशनने भारतातील प्रतिनिधी पंकज पाहुजा यांच्यामार्फत कोरेगाव पार्क आणि लष्कर भागातील ‘मेसर्स बर्गर किंग’चे मालक अनाहिता आणि शापूर इराणी यांच्याविरुद्ध दिवाणी दावा दाखल केला होता. व्यापारचिन्ह उल्लंघन, नुकसान भरपाई, पुण्याच्या बर्गर किंगला व्यापार चिन्हाच्या (ट्रेड मार्क) वापरावर कायमस्वरूपी मनाई, अशा प्रतिबंधक आदेशांसाठी अमेरिकेच्या बर्गर किंगकडून दावा दाखल करण्यात आला होता. यात ‘बर्गर किंग’च्यावतीने ॲड. ए. डी. सरवटे, ॲड. सृष्टी आंगणे आणि ॲड. राहुल परदेशी यांनी बाजू मांडली.
हेही वाचा >>>पुण्यातील सगळे डॉक्टर अन् हॉस्पिटल संपावर जातात तेव्हा…
अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात बर्गर किंग काॅर्पोरेशन कंपनीची स्थापना १९५४ मध्ये जेम्स मॅक्लामोर आणि डेव्हिड एडगर्टन यांनी स्थापन केली होती. त्यांनी ‘बर्गर किंग’ नावाने हॉटेल सुरू केले होते. या साखळी उपाहारगृह उद्योगाच्या अमेरिकेसह जगभरात शंभराहून अधिक देशांत १३ हजार शाखा आहेत. ‘बर्गर किंग’ हे व्यापार चिन्ह आणि व्यावसायिक नाव १९५४ पासून ते वापरत आहेत. या कंपनीने २०१४ पासून नवी दिल्लीत आणि नंतर मुंबई आणि पुण्यात उपाहारगृह सुरू केली. कंपनीला २००८ मध्ये पुण्यात सारख्याच नावाने आधीच एक उपहारगृह सुरू केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे अमेरिकेच्या कंपनीने जून २००९ मध्ये आपल्या वकिलांमार्फत पुण्यातील ‘बर्गर किंग’ला आपला व्यवसाय थांबवण्याची नोटीस बजावून सामंजस्याने हे प्रकरण मिटविण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, या प्रकरणात तडजोड झाली नाही.
© The Indian Express (P) Ltd