छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात पुणे शहरातील माजी महापौरांकडून धरणे आंदोलन करण्यात आले. राजभवनासमोर माजी महापौरांनी राज्यपालांविरोधात घोषणा दिल्या. राज्यपाल पदमुक्त होत नाहीत, तोपर्यंत त्यांचा निषेध केला जाईल, असे यावेळी जाहीर करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त विधान केले होते. त्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. राज्यपालांविरोधात अद्यापही आंदोलने, निदर्शने सुरूच आहेत. शहरातील माजी महापौर संघटनेनेही दंड थोपटले आहेत. माजी महापौर संघटनेच्यावतीने राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या पुढाकारातून हे आंदोलन करण्यात आले. माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, प्रशांत जगताप, कमल व्यवहारे, कमल ढोले पाटील, वैशाली बनकर, राजलक्ष्मी भोसले, रजनी त्रिभुवन, दत्ता गायकवाड, निलेश मगर, राजेश साने, दीपक मानकर, महेश हांडे, उदय महाले, निलेश निकम यावेळी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे माजी महापौर मुक्ता टिळक आणि मुरलीधर मोहोळ यांनी मात्र या आंदोलनाकडे पाठ फिरवली.
हेही वाचा- छत्रपती शिवरायांबद्दल बोलताना चूक झाली असेल तर माफी मागितली पाहिजे- किरीट सोमय्या
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही. त्यामुळे राज्यपालांविरोधात यापुढेही तीव्र निदर्शने केली जातील. या आंदोलनात राज्यपाल हटाव अशी मागणी करण्यात आली, असे माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितले.