पुण्यातील ऐतिहासिक वारशाबद्दल जाणून घेता घेताच ‘पुणेरी’ खाद्यपदार्थासाठी लोकप्रिय असणाऱ्या जागांचा शोध घेण्याचा मनोरंजक खेळ पुणेकरांना खेळता येणार आहे. इतकेच नव्हे, तर खणाच्या कापडापासून वस्तू बनविण्यास शिकण्याबरोबरच पाण्यावर तरंगणाऱ्या विटा आणि ‘गाणारे’ दगड पाहण्याची अनोखी संधीही नागरिकांना उपलब्ध होणार आहे.. जनवाणी संस्थेच्या ‘विरासत पुणे’ या उपक्रमाअंतर्गत १४ ते २१ एप्रिलदरम्यान हेरिटेज सप्ताहाचे आयोजन करण्यात आहे, त्यात या गोष्टी होणार आहेत.
संस्थेचे संचालक किरण कुलकर्णी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संस्थेचे सदस्य अरुण फिरोदिया, रवी पंडित, ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर’चे महासंचालक अनंत सरदेशमुख या वेळी उपस्थित होते.
या उपक्रमात नागरिकांना हेरिटेज वॉक, ट्री वॉक आणि सायकल रॅली अशा उपक्रमांद्वारे पुण्यातील विविध वारसा स्थळे पाहता येणार आहेत. विश्रामबाग वाडा, नाना वाडा, महात्मा फुले वाडा, ओंकारेश्वर मंदिर अशा ऐतिहासिक वास्तूंवर जमून इतिहासाची माहिती घेता घेता सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंदही घेता येणार आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, भारत इतिहास संशोधन मंडळ, भांडारकर संशोधन संस्था अशा संस्थांच्या कामाविषयी माहिती घेण्याच्या उपक्रमाचाही यात समावेश आहे. या हेरिटेज वीक मध्ये ‘पुणे फूड हंट’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाचाही समावेश असून त्यात पुणेरी खाद्यपदार्थासाठी लोकप्रिय असणाऱ्या जागांचा शोध घेण्याची स्पर्धा घेतली जाणार आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने काही कार्यशाळा आणि प्रदर्शनांचेही आयोजन करण्यात आले आहे. बोलक्या बाहुल्या, खणाच्या कापडाच्या वस्तू आदि बनविण्यास शिकविणाऱ्या कार्यशाळांचा यात समावेश असेल. पाण्यावर तरंगू शकणाऱ्या विटा, ‘सा, रे ग, म’ असे स्वर निघणारे ‘गाणारे’ दगड, जुन्या काळातील नाणी अशा वस्तूंची प्रदर्शने भरविण्यात येणार आहेत.
यातील काही उपक्रम विनामूल्य तर काही सशुल्क आहेत.