लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील मेट्रोच्या सेवेला तीन वर्षे पूर्ण झाली असून, या तीन वर्षांत मेट्रोचा विस्तार सात किलोमीटरवरून ३३.२८ किलोमीटरपर्यंत झाला आहे. येत्या काही वर्षांत पाच नव्या मार्गिकांचे उद्दिष्ट महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशनने (महामेट्रो) निश्चित केले आहे. सध्या दैनंदिन एक लाख ६० हजार प्रवासी मेट्रोचा वापर करीत असून, मेट्रोला तीन वर्षांत ९३ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती ‘महामेट्रो’कडून देण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ मार्च २०२२ रोजी पीसीएमसी ते फुगेवाडी आणि वनाझ ते गरवारे महाविद्यालय या प्रत्येकी सात किलोमीटर अंतराच्या मार्गिकांवर धावणाऱ्या मेट्रोचे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले होते. सुरुवातीच्या १६ महिन्यांतच मेट्रोला पुणेकरांची चांगली पसंती मिळाली. पर्यावरणपूरक, वातानुकूलित आणि आरामदायी प्रवासाला २१ लाख ४७ हजार ७५७ प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला.

याच मार्गिकेवरील जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा ३.६२ किलोमीटर लांबीचा टप्पा २९ सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू करण्यात आला. त्यानंतर मेट्रो प्रवाशांची संख्याही वाढली. वनाज ते रामवाडी या मार्गिकेवरील रुबी हॉल ते रामवाडी या मार्गिकेला ६ मार्च रोजी सुरुवात करण्यात आली. या मार्गिकेमुळे प्रवाशांची संख्या वाढून ती एक कोटी ६९ लाखांवर पोहोचली. या विस्तारानंतर आत्तापर्यंत पाच कोटी ९८ लाखांपेक्षा अधिक प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला आहे, तर ९३ कोटी ४ हजार २६८ रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती ‘महामेट्रो’ने दिली. पीसीएमसी ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज या मार्गिकांचे काम लवकरच हाती घेणार असल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

रविवार आणि गणेश चतुर्थीला विक्रमी उत्पन्न

मागील तीन वर्षांत १५ आणि १७ सप्टेंबर २०२४ रोजी सर्वाधिक उत्पन्न मिळाले. १५ सप्टेंबर (रविवार) रोजी दोन लाख २५ हजार ६४४ प्रवाशांनी प्रवास केला आणि २७ लाख ९५ हजार ४३२ रुपयांचे उत्पन्न मिळाले. १७ सप्टेंबर २०२४ (गणेश चतुर्थी) रोजी तीन लाख ४६ हजार ६३३ प्रवाशांनी प्रवास केला. या दिवशी ५४ लाख ९२ हजार ४१२ रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले.

मेट्रोची आताची स्थिती

  • पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी हा ३३.१ किलोमीटरचे प्रकल्प कार्यान्वित
  • पीसीएमती ते निगडी या मार्गिकेचे काम सुरू
  • स्वारगेट ते कात्रज भुयारी मार्गिका प्रकल्पाचा विस्तार निविदा प्रक्रियेच्या मंजुरीसाठी प्रलंबित

दुसऱ्या टप्प्यातील हे प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित

  • वनाज ते चांदणी चौक : १.१२ किलोमीटर
  • रामवाडी ते वाघोली : ११.३३ किलोमीटर
  • खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी : ३१.६४ किलोमीटर
  • नळ स्टॉप ते वारजे, माणिकबाग : ६.१२ किलोमीटर
  • हडपसर ते लोणी काळभोर : १६.९२ किलोमीटर
  • हडपसर ते सासवड : ५.५७ किलोमीटर

पुण्यातील नागरिकांचा सुरक्षित, वेगवान, वातानुकूलित प्रवासाला प्रतिसाद मिळत आहे. मेट्रोच्या नव्याने होणाऱ्या विस्तारामुळे पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मेट्रो महत्त्वाचे योगदान देणारी ठरेल. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने मेट्रो आणखी नवनवीन संकल्पना राबवित आहे. त्यासाठी वेगवेगळे आराखडे आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार होत आहे. -श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो, पुणे</strong>

Story img Loader