पुण्याचे हक्काचे पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर तालुक्यातील जुन्या सात गावांच्या यापूर्वी निश्चित केलेल्या जागेवरच होणार असल्याची स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली. तसेच प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यापूर्वी स्थानिकांशी चर्चा करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे विमानतळ बारामतीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना धक्का मानला जात आहे.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘पुण्याच्या पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत चर्चा झाली. या चर्चेमध्ये नवीन जागेला केंद्र सरकार आणि संरक्षण विभाग यांनी नकार दिला आहे. त्यामुळे आधीच्या सात गावांमध्ये निश्चित केलेल्या जागेला संरक्षण विभाग, विमानतळ प्राधिकरणासह सर्वप्रकारच्या मान्यता मिळाल्या आहेत. त्याच ठिकाणी विमानतळ करावा असा विषय पुढे आला आहे. या विमानतळासोबतच बहुउद्देशीय वाहतूक केंद्र (मल्टिमोडल लॉजिस्टिक हब) झाल्यास लाखो रोजगार तयार होतील. पुण्याला आधुनिक विमानतळ देण्याकरिता बहुउद्देशीय वाहतूक केंद्रासह विमानतळ अशा प्रकारचा विचार समोर आला आहे.’

हेही वाचा : पुणे : गणेशोत्सवात रोषणाई टाळून गरजूंना अन्नदान

नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पुरंदर विमानतळासाठी जुन्या जागेला सर्व परवानग्या आहेत, त्यामुळे हा निर्णय महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रकल्पासाठीचे भूसंपादन केल्यास आपण लवकर पुढे जाऊ शकू. जमीन संपादनाचे काम महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) करावे असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि सर्वपक्षीय चर्चा करून हा प्रकल्प मार्गी लावू. स्थानिकांशी चर्चा करून आराखडा पाठवावा, अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दिल्या आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले