पुणे : स्वातंत्र्याच्या अमृतमहाेत्सवी वर्षानिमित्त कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या राज्यातील १८९ कैद्यांची शिक्षा माफ करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने कारागृहात चांगली वर्तणूक असलेल्या देशभरातील कैद्यांची शिक्षा माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – पुणे : कारागृहातील कैद्यांना आता अंघोळीसाठी गरम पाणी
चांगली वर्तणूक, तसेच निम्मी शिक्षा भाेगलेल्या कैद्यांची शिक्षा माफ करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात कैद्यांना विशेष माफी देण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे. ज्यांनी शिक्षेचा ५० टक्के कालावधी पूर्ण केला आहे. अपंग कैदी, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या कैद्यांना विशेष माफी देण्यात येणार आहे. चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांनी शिक्षेचा कालावधी पूर्ण केला आहे. मात्र, त्यांना न्यायालयीन दंडाची रक्कम भरता न आल्याने कारागृहातून त्यांची मुक्तता झाली नाही. अशा कैद्यांना विशेष माफी देऊन त्यांची मुक्तता करण्यात येणार आहे.