शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आणि सेवा रस्त्यांवर रात्री अपरात्री राडारोडा टाकणाऱ्यांवर गस्त पथकाकडून करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईला वेग मिळाला आहे. गेल्या दोन महिन्यांत गस्त पथकाने ९४ खटले दाखल केले असून ६५ हजारांचा दंडही वसूल केला आहे.
महामार्ग आणि सेवा रस्त्यांवर काही महिन्यांपूर्वी पर्यंत सातत्याने रात्री राडारोडा टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यासंदर्भात महापालिका आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांची संयुक्त बैठक झाली होती. त्यानुसार सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय, वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय, कोथरूड-बावधन, धनकवडी-सहकारनगर आणि औंध-बाणेर क्षेत्रीय कायार्लयांतर्गत येणारा महामार्ग आणि सेवा रस्त्यांवरील राडारोडा उचलण्याबाबतचे नियोजन करण्यात आले होते. अतिरिक्त आयुक्तांकडूनही त्याबाबत सातत्याने आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

हेही वाचा >>>पुणे : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याकडे लाचेची मागणी ; दौंडमधील महसूल सहायकाला पकडले

महामार्गाच्या दोन्ही बाजूला नियमितपणे स्वच्छता विषयक कामे करण्यासाठी संबंधित क्षेत्रीय कार्यालयांनी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले होते. तसेच रात्री आठ ते सकाळी आठ या कालावधीत गस्ती पथकाकडून महामार्ग आणि सेवा रस्त्यांची पहाणी करावी आणि राडारोडा तसेच कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी सूचना करण्यात आली होती. त्यानुसार गस्ती पथकाकडून ९४ खटले दाखल करण्यात आले असून ६५ हजार ४५९ रुपयांचा दंडही राडारोडा टाकणाऱ्यांकडून वसूल करण्यात आला आहे. महामार्ग परिसरातील कचरा उचलण्यासाठी जेसीबी आणि टिपर उपलब्ध करून देण्यात आले असून स्वच्छतेची कामे तातडीने करण्यात येत आहेत, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उप आयुक्त आशा राऊत यांनी दिली.

Story img Loader