निवेदन आणि मुलाखतींच्या माध्यमातून गेली तीन दशके रसिकांना आनंद देणारे सुधीर गाडगीळ यांना यंदाचा ‘पुण्यभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी या ग्रामदैवतांच्या पाश्र्वभूमीवर सोन्याच्या फाळाने पुण्यभूमी नांगरणारे बालशिवाजी, असे स्मृतिचिन्ह आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
आपल्या कर्तृत्वाने पुण्याचे नाव जगाच्या पातळीवर नेणाऱ्या व्यक्तीस ‘पुण्यभूषण फाउंडेशन’तर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. पुण्यभूषण पुरस्काराचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. ‘वनराई’ चे अध्यक्ष मोहन धारिया यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने यंदाच्या पुरस्कारासाठी सुधीर गाडगीळ यांची निवड केली आहे. लवकरच एका भव्य कार्यक्रमात सुधीर गाडगीळ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या प्रसंगी नारायण सुरसे, छगनलाल अनेचा, बाळकृष्ण मिरजकर, चंद्रकांत पायगुडे आणि गणपत गायकवाड या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी कळविले आहे.
पत्रकारितेतील नोकरी सोडून मराठीतील पहिला व्यावसायिक सूत्रसंचालक होण्याचे धाडस सुधीर गाडगीळ यांनी तीन दशकांपूर्वी केले. ‘मंतरलेल्या चैत्रबनात’ (सुधीर फडके), ‘मत्स्यगंधा ते महानंदा’ (पं. जितेंद्र अभिषेकी), ‘कांचनसंध्या’ (कविवर्य बा. भ. बोरकर), मराठी चित्रपटगीतांचा प्रवास मांडणारी ‘स्मरणगाणी’, ‘नक्षत्रांचं देणं’ (डॉ. वसंतराव देशपांडे), ‘भावसरगम’ (पं. हृदयनाथ मंगेशकर), ‘भावगीते’ (अरुण दाते) या कार्यक्रमांसह पं. भीमसेन जोशी यांच्यासमवेत ‘संतवाणी’चे निरुपणही त्यांनी केले आहे. ज्येष्ठ पाश्र्वगायिका आशा भोसले यांच्या कार्यक्रमांचे ते गेली २५ वर्षे सूत्रसंचालन करीत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, इंदिरा गांधी, प्रमोद महाजन, नितीन गडकरी, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, शंतनूराव किलरेस्कर, नाना पाटेकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. जयंत नारळीकर, राहुलकुमार बजाज, एम. एफ. हुसेन, माधुरी दीक्षित, महेश मांजरेकर, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या एकूण तीन हजार मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत. त्यांची ‘मुक्काम’, ‘मुद्रा’, ‘लाईफस्टाईल’, ‘ताजंतवानं’, ‘झगमगती दुनिया’ ही पुस्तके प्रसिद्ध झाली असून सध्या शाहू मोडक यांच्या जीवनचरित्राचे शब्दांकन सुरू आहे. ‘मुलखावेगळी माणसं’ हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम जगभरात झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा