लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी घेण्यात येणारी शैक्षणिक प्रणाली ही ठरावीक संस्थेकडून न घेता निविदा प्रक्रिया राबवून त्यानंतरच घेतली जाणार असल्याची भूमिका आता महापालिकेने घेतली आहे. हे काम कोणत्याही संस्थेला थेट दिले जाणार नसल्याचे महापालिकेच्या शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

पुणे महापालिकेच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या गणिताचा पाया पक्का करण्यासाठी त्यांना पाढे शिकवले जाणार आहेत. यासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी सव्वा कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यासाठी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी ठेवण्यात आलेल्या निधीचे वर्गीकरण करून ही खरेदी केली जाणार आहे. राज्यातील एका माजी मंत्र्याने केलेल्या शिफारशीनंतर महापालिकेने एका खासगी संस्थेकडून हे शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची तयारी केली आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता.

आणखी वाचा-खबरदार! कामात कुचराई तर कारवाई, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणाला दिला इशारा?

एका संस्थेला डोळ्यासमोर ठेवून महापालिकेकडून अशा पद्धतीने केल्या जाणाऱ्या शैक्षणिक साहित्याच्या खरेदीच्या निर्णयावर महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा झाली. ठरावीक संस्थेकडून ही खरेदी केली जाणार असल्याबाबत ‘लोकसत्ता’नेही महापालिकेकडे विचारणा केली असता, त्यावर विचार केला जाईल, असे स्पष्टीकरण महापालिकेने दिले होते.

महापालिकेच्या कारभारावर यामुळे जोरदार टीका होत असल्याचे लक्षात येताच महापालिकेने एक पाऊल मागे घेतले. विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया पक्का करण्यासाठी आवश्यक असलेली ही शैक्षणिक प्रणाली खरेदी करताना ठरवीक संस्थेकडून न घेता निविदा प्रक्रिया राबवून याची खरेदी केली जाणार असल्याचे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रमुख आशा राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, शुक्रवारी होणारी स्थायी समितीची बैठक काही कारणास्तव तहकूब करण्यात आल्याने या उपक्रमासाठी वर्गीकरणाद्वारे निधी देण्याबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले म्हणाले, स्थायी समितीत हा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर विचार होईल, चर्चा होईल आणि मगच याबाबत निर्णय घेतला जाईल. तर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. म्हणाले, या शैक्षणिक साहित्याची खरेदी एका संस्थेकडून होणार नाही. निविदा प्रक्रिया राबवून त्यानंतरच खरेदी केली जाणार आहे.

आणखी वाचा-पादचाऱ्याला मारहाण करुन मोबाइल चोरणारा गजाआड

नक्की काय म्हटले आहे प्रस्तावात?

‘महापालिका शाळांमधील मुलांचे गणित कच्चे आहे. करोनानंतर यामध्ये अधिकच वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिका शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलांचा गणिताचा पाया चांगला करण्यासाठी महापालिकेने या शैक्षणिक प्रणालीची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांचे गणित पक्के व्हावे, यासाठी या संस्थेने पाढे पाठ करून घेणारे साहित्य तयार केले आहे. संस्थेने दिलेल्या अंदाजानुसार, या प्रणालीच्या वापरासाठी शैक्षणिक साहित्याचा दर प्रति ५० विद्यार्थ्यांसाठी एका संचाची किंमत ७,६७० रुपये इतका आहे. त्यानुसार, पहिली ते आठवीच्या अंदाजे ८८ हजार विद्यार्थ्यांसाठी १७६० संच लागणार असल्याने, ते संच खरेदी करण्यासाठी १ कोटी ३४ लाख ९९ हजार २०० रुपये खर्च येणार आहे. या उपक्रमासाठी चालू वर्षाच्या, २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात तरतूद नाही. त्यामुळे हा निधी वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या आणि बारावीच्या परीक्षेत ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत मुलांना प्रत्येकी ५१ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते, त्या रकमेतून हा निधी वर्गीकरणाद्वारे दिला जावा.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Purchase of educational systems will be done through tendering municipal corporations education department clarified pune print news ccm 82 mrj