गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी शहरातील प्रमुख घाटांवर महापालिकेतर्फे सीसी टीव्ही कॅमेरे बसवले जाणार असून त्यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी होत असल्याचे उघड झाले आहे. चांगल्या प्रतीचे तीन कॅमेरे आणि एक व्हीडीओ रेकॉर्डर यांची किंमत २० हजार रुपये असताना महापालिका मात्र त्यासाठी दोन दिवसांकरिता ४७ हजार रुपये एवढे भाडे देणार आहे.
सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्रबुद्धे यांनी या संबंधीची माहिती दिली. या प्रस्तावाला संघटनेने विरोध केला असून नागरिकांनी कररूपाने दिलेल्या पैशांची ही लूट आहे, असे पत्र संघटनेतर्फे आयुक्तांना देण्यात आले आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी महापालिकेतर्फे शहरातील विविध ठिकाणी तसेच काही घाटांवर सीसी टीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. ते भाडे तत्त्वावर घेतले जाणार असून त्यासाठीची तब्बल ३० लाख रुपयांची निविदा नुकतीच उघडण्यात आली.
एका ठिकाणी तीन सीसी टीव्ही कॅमेरे आणि एक रेकार्डर या पद्धतीने ही यंत्रणा २२ ठिकाणी बसवण्याचे नियोजन आहे. चांगल्या प्रतीचे तीन कॅमेरे आणि एक रेकॉर्डर यांची बाजारातील किंमत २० हजार रुपये इतकी आहे. तर महापालिका याच यंत्रणेसाठी दोन दिवसांकरिता ४७ हजार रुपये इतके भाडे देणार आहे. जेवढी रक्कम महापालिका भाडे म्हणून देणार आहे, त्यापेक्षा निम्म्या किमतीत नवीन कॅमेरे खरेदी करणे शक्य असताना देखील तशी खरेदी न करता ही यंत्रणा भाडय़ाने घेण्याचा आग्रह का धरण्यात आला आहे, असा प्रश्न सजग नागरिक मंचने उपस्थित केला आहे. ही नागरिकांनी कररूपाने दिलेल्या पैशांची उधळपट्टी असून ती निश्चितच क्षम्य नाही. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून सविस्तर खुलासा प्रशासनाने करावा, अशीही मागणी संघटनेने केली आहे.
या योजनेतील कॅमेरे कोणत्या प्रकारचे असावेत, त्यांच्या तांत्रिक क्षमता कशा पद्धतीच्या असाव्यात, त्यांचे रेकॉर्डिग ऑनलाइन पाहता येणार आहे का, ते कोण करणार आहे, याबाबी स्पष्ट झालेल्या नाहीत. त्यामुळे ही योजना व्यवहार्य नसल्याचीही तक्रार संघटनेने केली आहे. ही यंत्रणा कायमस्वरूपी विकत घ्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Story img Loader