उन्हाळ्यामध्ये विजेची वाढती मागणी लक्षात घेता सध्या खुल्या बाजारातून आणखी वीज खरेदी करण्याबाबत ‘महावितरण’कडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. मे व जून महिन्यासाठी ७५० मेगावॉट विजेची खरेदी करण्याबाबत निविदा काढण्यात आल्या आहेत. खुल्या बाजारातून ही वीज मिळाल्यास अखंड विजेची गरज असणाऱ्या शहरांना त्याचा लाभ मिळू शकणार आहे.
उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने एप्रिल ते जून या कालावधीमध्ये मोठय़ा प्रमाणावर विजेची मागणी असते. यंदा उन्हाळ्याच्या झळा एप्रिलमध्येच मोठय़ा प्रमाणावर जाणवू लागल्या असल्याने विजेची मागणी वाढली आहे. महानिर्मितीच्या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज व यापूर्वी खुल्या बाजारातून करण्यात आलेल्या वीज खरेदीमुळे एप्रिलमध्ये विजेची गरज भागू शकते, असे सांगण्यात येते. मे महिन्यामध्ये विजेची गरज आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ही शक्यता गृहीत धरून खुल्या बाजारातून विजेचे नियोजन करण्याच्या हालचाली सध्या करण्यात येत आहेत.
सध्या सुमारे साडेचौदा हजार मेगावॉट विजेची उपलब्धता आहे. मागणी त्यापेक्षा जास्त असली, तरी वीजकपातीच्या माध्यमातून मागणी व पुरवठा याची सांगड घातली जाते. वीजकपात ही केवळ अत्यंत कमी वसुली असलेल्या भागातच केली जात असल्याचे ‘महावितरण’चे म्हणणे आहे. पुरेशी वसुली असलेल्या भागांना पुरेशी वीज दिली जात असल्याचेही सांगण्यात येते. त्यानुसार सध्या राज्याच्या विविध भागांना वीजकपातीतून मुक्ती मिळालेली आहे.
उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने मे महिन्यामध्ये विजेची मागणी साडेसोळा हजार मेगावॉटच्याही पुढे जात असते. विजेची मागणी व उपलब्धता यातील तूट वाढल्यास वीजकपात करण्याशिवाय पर्याय राहत नाही. हे टाळण्याच्या दृष्टीने खुल्या बाजारातून योग्य दराने वीज खरेदीचे नियोजन करणे गरजेचे असल्याने त्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. १ ते ३१ मे, १ जून ते १५ जून व १६ जून ते ३० जून या तीन टप्प्यांमध्ये ७५० मेगावॉट वीजखरेदी करण्याबाबत सध्या निविदा काढण्यात आल्या आहेत. २३ एप्रिलला निविदा भरण्याची अंतिम तारीख देण्यात आली होती. मात्र, सध्या ही तारीख बदलण्यात आली असून, ती २९ एप्रिल करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा