पालखी सोहळ्यातील स्वच्छता आणि ग्रामसभा दिंडीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या विविध योजना वारकरी आणि समाजापर्यंत पोहोचवाव्यात, अशी अपेक्षा ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी व्यक्त केली.
राज्य सरकारचा ग्रामविकास विभाग, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, महिला आणि बालकल्याण विभाग यांच्यातर्फे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज आणि संतशिरोमणी तुकाराममहाराज पालखी सोहळ्यातील स्वच्छता दिंडी, ग्रामसभा दिंडी आणि कुपोषणमुक्त महाराष्ट्र दिंडीला जयंत पाटील यांनी हिरवा कंदील दाखविला. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्ता भरणे, सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षा निशिगंधा माळी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एस. एस. संधू, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी सौरभ राव, अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाशमहाराज बोधले या वेळी उपस्थित होते.
एसएमएस, फेसबुक, व्हॉटस् अॅप आणि ट्विटर या आधुनिक माध्यमांचा लोकांवर किती प्रभाव पडतो हे लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे. मात्र, वारीच्या माध्यमातून लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचे काम हे संत परंपरेच्या माध्यमातून होते, असे सांगून जयंत पाटील म्हणाले, स्वच्छता आणि ग्रामसभा िदडीच्या माध्यमातून गेल्या वर्षी तीन लाख लोकांपर्यंत पोहोचता आले. यंदाच्या वर्षी पाच लाख लोकांपर्यंत हा संदेश घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी ऑडिओ-व्हिडीओची सुविधा असलेले डिजिटल रथ तयार करण्यात आले आहेत. ग्रामपंचायतींनी राज्यभरात लावलेल्या दहा कोटी झाडांपैकी साडेसात कोटी झाडे जगली आहेत. त्यामुळे पर्यावरण संतुलन टिकावे हा संदेश लोकांनी आत्मसात केला आहे.
एस. एस. संधू म्हणाले,की ग्रामस्वच्छता क्षेत्रात लक्षणीय सुधारणा झाली असली तरी त्यामध्ये चांगली कामगिरी करण्यास वाव आहे. ‘कळतयं पण वळत नाही’ अशी स्थिती काही भागात आहे. घरातील महिलांना उघडय़ावर शौचाला जावे लागत असताना घरामध्ये शौचालये बांधण्यामध्ये मात्र दिरंगाई करण्याकडे कल आहे. यामध्ये बदल घडविण्याच्यादृष्टीने ग्रामविकास विभाग प्रयत्नशील आहे.
या वेळी प्रकाशमहाराज बोधले, दत्ता भरणे, निशिगंधा माळी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रभाकर देशमुख यांनी प्रास्ताविक केले. कांतिलाल उमाप यांनी आभार मानले.