पिंपरी : अपंगांना मुख्य प्रवाहात सामावून घेऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी महापालिकेच्या दिव्यांग भवन फाउंडेशनच्या वतीने ‘पर्पल जल्लोष-दिव्यांगांचा महाउत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे होणाऱ्या तीन दिवसीय महोत्सवाला आजपासून (१७ जानेवारी) सुरुवात होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सायंकाळी पाच वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
याबाबत आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘पर्पल जल्लोष हा महोत्सव अपंगांची प्रतिभा आणि त्यांच्या नवकल्पनांना वाव देणारा, तसेच अपंगांच्या क्षमतांमध्ये वाढ करणारा उपक्रम आहे. सामाजिक विकासातील अडथळे दूर करण्यास चालना देणे, अपंगांबाबत समाजात असलेल्या प्रचलित विचारांविषयी प्रबोधन करणे, अपंग व्यक्तींविषयी समाजात असलेले नकारात्मक समज बदलण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांचे सर्वांगीण समावेशन करण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे, हा महोत्सवाचा हेतू आहे. अपंगांसाठी कार्यरत असलेल्या ४० पेक्षा जास्त स्टार्टअप, विविध काॅर्पोरेट कंपन्या आणि विविध संस्था सहभागी होणार आहेत.’
हेही वाचा – पिंपरीतील ४३ मालमत्तांचा लिलाव, मालमत्तांचे मूल्य २२१ कोटी रुपये; काय आहे कारण?
या महोत्सवात नृत्य, गायन, अभिनय, कविसंमेलन, गप्पा लेखकांशी, गझलरंग, कथाकथन, निमंत्रितांचे कविसंमेलन, परिसंवाद, कवी कट्टा, फॅशन-शो यांसारखे विविध कार्यक्रम होणार आहेत. अपंगांच्या जीवनावर आधारित लेखन, साहित्य त्यांच्या प्रेरणादायी कथा आणि प्रवासाचा उलगडा करणारे विशेष सत्रदेखील होणार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले.