हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला पार्किंगमध्ये बारा हजार रुपये आणि डेबिट, क्रेडिट कार्ड असलेली पर्स सापडली. पर्समधील पैसे व मौल्यवान वस्तू पाहूनही या व्यक्तीचा प्रामाणिकपणा ढळला नाही. त्याने विविध मार्गानी शोध घेण्याचा प्रयत्न करून देखील महिलेचा शोध लागला नाही. शेवटी एका ओळखीच्या पोलीस अधिकाऱ्याच्या मदतीने पर्स असलेल्या महिलेचा शोध घेऊन तिला ही पर्स परत केली.
अरविंद धुळेकर (रा. वडगाव बुद्रुक) असे या प्रामाणिक व्यक्तीचे नाव आहे. धुळेकर हे त्यांच्या पत्नीसोबत नळस्टॉप येथील हॉटेल समुद्र येथे शनिवारी रात्री जेवण करण्यासाठी गेले होते. मोटार लावत असताना त्यांना पार्किंग मध्ये पर्स सापडली. त्या पर्समध्ये पाहिले असता ११ हजार ९०० रुपये, डेबिट व क्रेडिट कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना व इतर वस्तू असल्याचे आढळून आले. या पर्समध्ये असलेल्या वस्तूंवरून महिलेचा शोध घेण्याचा धुळेकर यांनी रविवारी दिवसभर प्रयत्न केला. पर्समध्ये सापडलेला वाहन चालविण्याचा परवाना हा मुंबईचा असल्यामुळे त्यावरूनही माहिती मिळाली नाही. या पर्समध्ये काही व्हिजिटिंग कार्डदेखील होती. त्याच्यावर धुळेकर यांनी संपर्क साधला. पण, महिलेचा शोध काही लागला नाही.
गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र जोशी हे धुळेकर यांच्या परिचयाचे होते. त्यामुळे पैशाची पर्स घेऊन धुळेकर त्यांच्याकडे गेले. त्यांनी त्यांना सापडलेली पैशाची पर्स त्यांच्याकडे दिली. जोशी यांनी पर्सची पाहणी केली असता त्यामध्ये काशीबाई नवले महाविद्यालयाच्या व्यवस्थापन विभागाचा एक कागद सापडला. त्यामुळे या महाविद्यालयात संपर्क साधल्यानंतर ही पर्स या महाविद्यालयातील प्राध्यापक हर्षां गांधी यांची असल्याचे समजले. गांधी यांना बोलवून धुळेकर यांच्या उपस्थितीत ही पर्स त्यांना परत केली. त्या वेळी गांधी यांनी धुळेकर व जोशी यांचे मनापासून आभार मानले.
धुळेकर यांनी सांगितले, की या पर्समध्ये असलेल्या रकमेपेक्षा वाहन चालविण्याचा परवाना आणि डेबिट, क्रेडिट कार्ड खूप महत्त्वाची होती. हे सर्व नव्याने काढण्यासाठी खूप त्रास होतो. अनेक वेळा चकरा माराव्या लागतात. धुळेकर हे समाजिक कायकर्ते म्हणून काम करतात. तसेच, ‘रिअल इस्टेट ऑफ असोसिएशन ऑफ पुणे’चे ते संस्थापक सदस्य आहेत.

Story img Loader