बारामती : बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात कथिक आर्थिक गैरव्यवहारा प्रकरणी कारखान्यातील संबंधित विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन व तात्काळ गुन्हा दाखल करणार, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.
श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचारी व कामगार यांची हजेरी नोंदीमध्ये संगनमताने कारखाना प्रशासनाची फसवणूक करून आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी साखर कारखान्याचे लेबर व टाइम ऑफिस विभागातील लेबर ऑफिसर, हेअर टाईम कीपर, टाईम कीपर, सर्व क्लार्क व कर्मचारी यांचे निलंबन करण्याचा निर्णय साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने २७ फेब्रुवारी २०२५ पार पडलेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेमध्ये घेतला असून सोबतच या सर्वांनी विरोधात व लेबर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदार यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करणार असल्याची माहिती श्री.सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
श्री. जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की, ” आपल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर असताना कारखान्याच्या कामकाजामध्ये चुकीचे काम करणाऱ्या कोणत्याही घटकाला पाठीशी घालू नये, अशी कारखान्याच्या मार्गदर्शक व राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी संचालक मंडळात वेळोवेळी सूचना केलेली आहे, त्यानुसारच कारखान्याच्या संचालक मंडळ काम करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे असताना जाणीवपूर्वक साखर कारखान्याच्या प्रगतीमध्ये अडसर आणि कारखान्याचे नुकसान होईल असे काही अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज केल्याचे निदर्शनात आल्याने या अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करण्याचा निर्णय कारखानाच्या संचालक मंडळांनी घेतला आहे, नियमानुसार कायदेशीर मुद्दे विचारात घेऊन या प्रकरणाची इंडस्ट्रियल व लेबर न्यायालयामध्ये काम पाहणाऱ्या तज्ञ वकिलाची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करून नियमाप्रमाणे सखोल तपास करण्याचा निर्णय देखील संचालक मंडळांनी घेतलेला आहे.
कारखानाचे अध्यक्ष श्री. जगताप पुढे म्हणाले, या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत असेल २०१५ पासून आज अखेर पर्यंत रोजंदारी कर्मचाऱ्यांची हजेरी नोंद आणि प्रत्यक्ष दिलेला पगार झालेले कामकाज इत्यादींची मान्यताप्राप्त सनदी लेखापाला मार्फत ऑडिट करून चौकशी करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे, श्री. जगताप पुढे म्हणाले की, या प्रकरणांमध्ये दोषी असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचा संचालक मंडळाने निर्णय घेतलेला असून या प्रकरणांमध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे संचालक मंडळाच्या वतीने समस्त सभासद व शेतकरी यांना कळवित आहोत.