मराठमोळे फेटे बांधलेल्या मुलामुलींची गर्दी, ‘आव्वाज कुणाचा पुरुषोत्तमचा’च्या घोषणा आणि ढोलताशाच्या तालबद्ध वादनात पालखीतून निघालेली कलोपासकच्या करंडकाची शोभायात्रा..अशा वातावरणात रविवारी डेक्कन जिमखान्यापासून भरतनाटय़ मंदिरापर्यंतचा परिसर दुमदुमला. निमित्त होते ‘महाराष्ट्रीय कलोपासक’तर्फे घेतल्या जाणाऱ्या ‘पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षांच्या सोहळ्याचे.
या निमित्ताने बीएमसीसी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नाटय़ व चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, पोलीस आयुक्त सतीश माथूर, महापौर चंचला कोद्रे, ‘कलोपासक’चे अध्यक्ष निनाद बेडेकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह अनंत भिडे उपस्थित होते.
स्पर्धक म्हणून आपण घेतलेले ‘पुरुषोत्तम’चे अनुभव पटेल यांनी या वेळी उलगडले. ते म्हणाले,‘‘१९६०-७० मधील एकांकिकांची मांडणी साधी आणि छान असे, आजच्या एकांकिका खूप गुंतागुतीच्या तरीही छानच आहेत. ‘पुरुषोत्तम’मध्ये एकांकिका करणे हे एक आव्हान असते. आपण जेव्हा पहिली रंगभूषा चेहऱ्यावर चढवून रंगमंचावर प्रवेश करतो, तेव्हा आपण कुणीही नसतो. तो एका अभिनेत्याचा जन्म असतो. उत्तम अभिनेता आणि ‘सेलिब्रिटी’ यात खूप फरक आहे. पण आधी चांगला माणूस बना. आज देश ज्या परिस्थितीतून चालला आहे, त्यात रंगमंचावर काय सादर करायला हवे याचे भान नाटककारांनी बाळगणे आवश्यक आहे. राज्यव्यवस्थेवरचा सगळा राग विजय तेंडुलकरांनी ‘घाशीराम कोतवाल’मध्ये ओतला होता. आपले जहाल विचार तरुणाईला चाळीस मिनिटांच्या एकांकिकेतही संयतपणे आणि परिणामकारक रीत्या मांडता येतील. तेव्हा टीव्हीवरच्या बाष्कळ चर्चाकडे लक्ष न देता तटस्थपणे नाटके लिहा.’’
लहानपणी एकदाच एका नाटकात केलेल्या चेटकिणीच्या भूमिकेची गंमत माथूर यांनी सांगितली. ते म्हणाले, ‘‘मी केलेली चेटकिणीची भूमिका पाहून लोकांनी मला नाटक सोडा, तुमच्यासाठी टेबल टेनिसच बरे, असा सल्ला दिला होता. पण मी जयपूरला जब्बार पटेल आणि मोहन आगाशे यांची नाटके बघत असे. नाटक बसवण्याच्या कामात खूप वेळ मोडतो. तरुणाई तेवढा वेळ तरी सोशल मीडियापासून दूर राहते याचा आनंद वाटतो.’’
घोले रस्त्यावरील महापालिकेचे कलादालन केवळ तरुणांच्या उपक्रमांसाठी राखून ठेवावे, अशी सूचना पटेल यांनी महापौरांना केली.
संग्रहित लेख, दिनांक 4th Aug 2014 रोजी प्रकाशित
तरुणाईच्या ‘आव्वाजा’ने सजली ‘पुरुषोत्तम’ची पन्नाशी!
‘पुरुषोत्तम’मध्ये एकांकिका करणे हे एक आव्हान असते. आपण जेव्हा पहिली रंगभूषा चेहऱ्यावर चढवून रंगमंचावर प्रवेश करतो, तेव्हा आपण कुणीही नसतो. तो एका अभिनेत्याचा जन्म असतो.
First published on: 04-08-2014 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Purushottam karandak golden jubilee