महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण असलेल्या ‘पुरुषोत्तम करंडका’ची सुवर्णझळाळी लघुपटातून उजळली आहे. या स्पर्धेची महती उलगडणारा २० मिनिटांचा लघुपट प्रथमेश इनामदार या युवकाने दिग्दर्शित केला आहे. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचा हा दृक-श्राव्य इतिहास आता लवकरच एक तासाच्या लघुपटामध्ये बंदिस्त होणार आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे पुरुषोत्तम करंडक ही आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. हे औचित्य साधून कलोपासकांसाठी मॉन्सून विंड्स मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट्सने या लघुपटाची निर्मिती केली आहे. कलोपासकांच्या सुवर्णमहोत्सवी मेळाव्यात हा लघुपट पाहताना अनेकांनी जुन्या आठवणी नव्याने जागविल्या. या लघुपटावरूनच आता एक तास लांबीचा लघुपट तयार करण्यात येणार असल्याची माहिती प्रथमेश इनामदार याने दिली.
प्रथमेश इनामदार म्हणाला, महाविद्यालयीन कालखंडामध्ये मी स्वत: या स्पर्धेत कधी सहभागी झालो नाही. मात्र, ‘लोकसत्ता’मध्ये पुरुषोत्तम करंडक स्पर्धेविषयी लेखन केले होते. ‘नॉस्टेल्जिया पुरुषोत्तम’चा या सदरांर्तगत डॉ. मोहन आगाशे, डॉ. जब्बार पटेल, सतीश आळेकर, राहुल सोलापूरकर, मृणाल कुलकर्णी, अभिराम भडकमकर, सुबोध भावे यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यामुळे या स्पर्धेविषयीचा माझा अभ्यास पक्का झालेला होता. यंदाच्या महाअंतिम फेरीदरम्यान राज्यभरातील साडेतीनशे विद्यार्थ्यांशी संवाद साधता आला. मयूर देशमुख या मित्रामुळे कुणाल श्रीगोंदेकर या कॅमेरामन मित्राने चार दिवस स्पर्धेचे चित्रीकरण केले. सतीश राजवाडे, सुप्रिया विनोद आणि प्रसाद वनारसे या महाअंतिम फेरीच्या परीक्षकांसह योगेश सोमण, प्रकाश पारखी, माधव अभ्यंकर, विवेक लागू, रंगभूषाकार प्रभाकर भावे, कलोपासक संस्थेचे राजन ठाकूरदेसाई आणि राजेंद्र नांगरे यांच्या मुलाखतींचा समावेश आहे. या स्पर्धेचे वैशिष्टय़, शिस्त, भावी आयुष्यातील महत्त्व यांसह भविष्यातील मुलांना मार्गदर्शन व्हावे हाच या लघुपटाचा उद्देश होता. नव्याने करण्यात येणाऱ्या एक तासाच्या लघुपटामध्ये काही महत्त्वाच्या एकांकिकांचे काही अंश (क्लिपिंग्ज) आणि कलाकारांच्या छोटेखानी मनोगतांचा समावेश आहे.