लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

पुणे : गर्भवती मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तिच्यावर उपचार करणारे डॉ. सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने नोटीस बजावली आहे. या नोटिशीवर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) राष्ट्रीय अध्यक्षांसह महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) माजी अध्यक्षांनी रविवारी आक्षेप नोंदविला.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रशासक डॉ. विंकी रूघवानी यांनी ईश्वरी (तनिषा) भिसे या गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावली होती. या नोटिशीला रुग्णालयाने दिलेल्या प्रतिसादाच्या आधारे डॉ. रूघवानी यांनी डॉ. सुश्रुत घैसास यांना नुकतीच नोटीस बजावली. नोटिशीला उत्तर देण्यास डॉ. घैसास यांना चार दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दिलीप भानुशाली म्हणाले, ‘आपत्कालीन स्थितीत रुग्णावर उपचार करण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. रुग्णाकडून अनामत रक्कम मागण्याचे धोरण रुग्णालयाने आखून दिलेले असते. त्या धोरणाचे पालन तिथे कार्यरत डॉक्टरांकडून केले जाते. त्यामुळे अनामत रक्कम मागण्याबाबत डॉक्टरांऐवजी रुग्णालयाला विचारणा करायला हवी. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने डॉ. घैसास यांना बजाविलेली नोटीस चुकीची आहे.’

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे म्हणाले, ‘एखाद्या रुग्णाच्या उपचारात निष्काळजीपणा केला असेल तर परिषद संबंधित डॉक्टरला नोटीस बजावू शकते. याचबरोबर एखाद्या रुग्णाच्या नातेवाइकाने डॉक्टरविरोधात तक्रार केल्यास नोटीस बजावण्यात येते. या प्रकरणी डॉक्टरांनी उपचारच केले नसल्याने निष्काळजीपणा केल्याबद्दल स्वत:हून परिषदेने नोटीस पाठविणे अप्रस्तुत आहे. केवळ रुग्णालयाच्या प्रतिसादावर आणि माध्यमांतील बातम्यांवर विसंबून राहून, अशा प्रकारची नोटीस परिषदेला बजावता येत नाही.’

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला एखाद्या प्रकरणाची स्वत:हून दखल घेऊन नोटीस बजाविण्याचा अधिकार आहे. या प्रकरणात वैद्यकीय निष्काळजीपणाची शक्यता समोर आल्याने आम्ही नोटीस बजावली आहे. आम्ही केवळ डॉक्टरांकडून स्पष्टीकरण मागवले असून, त्यांच्यावर ठपका ठेवलेला नाही. -डॉ. विंकी रूघवानी, प्रशासक, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद