पुणे : वैयक्तिक, कौटुंबिक छायाचित्रे कृत्रिम प्रज्ञा (एआय) साधनांद्वारे घिबली (जपानी उच्चार जिबुरी) शैलीत रूपांतरित करून नव्या ट्रेंडमध्ये सामील होण्याचा कल एकीकडे सुरू असला, तरी तो वापरकर्त्याला धोकादायक वळणावर नेणारा ठरू शकतो. अशी छायाचित्रे एआय साधनांना देणे हे आपण होऊन आपली वैयक्तिक माहिती त्रयस्थाला बहाल करण्यासारखे असल्याने, त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता तज्ज्ञांना वाटते.‘एआय साधनाला वैयक्तिक छायाचित्र पुरविणे कितपत सुरक्षित आहे,’ असा प्रश्न एखाद्या एआय साधनालाच विचारला, तर ‘त्यात जोखीम असून, त्या साधनाच्या खासगीपणाच्या धोरणावर सुरक्षितता अवलंबून आहे, असे उत्तर मिळते! ‘ओपनएआय’ कंपनीच्या ‘चॅटजीपीटी’ या एआय साधनाद्वारे कोणतीही छायाचित्रे घिबली शैलीत रूपांतरित करण्याचा ट्रेंड नुकताच सुरू झाला. नंतर ग्रोक, जेमिनी आदी एआय साधनांनीही ते शक्य केले.
आता तर कोण अधिक सुलभतेने छायाचित्रांचे रूपांतर करतो, अशी स्पर्धाच सुरू झाली आहे. यामध्ये सर्वसामान्यांबरोबरच नेते, अभिनेत्यांनाही आपली छायाचित्रे या शैलीत रूपांतरित करण्याचा मोह आवरलेला नाही. मात्र, आता त्यातून काही नैतिक, बौद्धिक संपदा हक्काच्या भंगाबाबतचे आणि वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेचे प्रश्न उपस्थित होत आहेत. माहितीचा दुरुपयोग हा यातील नजीकचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ‘छायाचित्र हासुद्धा एक प्रकारचा मजकूर आहे. आपण तो एआय साधनांना पुरवून त्याला आपली वैयक्तिक माहिती देत आहोत. आपण कुठे आहोत, कुठे राहतो, कुठे जातो, कुठे गेलो, आपल्या कुटुंबात कोण आहे, आपल्या संपर्कात कोण असते, आहे, अशी नाना प्रकारची माहिती या छायाचित्रांतून मिळते, जिचा दुरुपयोग सहज शक्य आहे.
‘डीपफेक’ छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती हा अगदी टोकाचा गैरवापरही शक्य आहेच,’ असे एआय तज्ज्ञ आणि लेखक डॉ. भूषण केळकर सांगतात. ‘मी पुरविलेल्या छायाचित्राचे ‘डीपफेक’ केले गेले आणि त्यात मी संकटात असल्याचे दाखवून ते चित्र माझ्या आप्तेष्टांना, ओळखीच्यांना – जे मी पुरविलेल्या छायाचित्रांमुळेच कळले आहे – पाठवून त्यांच्याकडून पैसे उकळणे सहज शक्य आहे. शिवाय, आत्ता मोफत आहे, म्हणून गमतीसाठी वापर करून पाहिला, असे आपल्याला वाटले, तरी एआय कंपन्या मिळालेला विदा जाहिरातदारांना विकून, त्याद्वारे तुम्हालाच ‘गिऱ्हाईक’ बनवू शकतात,’ याकडेही केळकर लक्ष वेधतात.
दुसरीकडे, एखाद्या चित्रशैलीची अशी ‘एआय नक्कल’ कलाकारांच्या अस्सल कामावर अन्याय आहे का, असे विचारले असता, ‘दीड-दोन दशकांपूर्वी कापड वा भिंतींवर चित्रे रंगविणाऱ्यांच्या व्यवसायावर डिजिटल फ्लेक्सने गदा आणली, तशी एआय आता हवे तसे चित्र बनवून देत असल्याने चित्रकारांवरही परिणाम होणार आहे,’ असे चित्रकार शशिकांत धोत्रे सांगतात. मात्र, जेथे हाताने काढलेल्या चित्राचा अस्सलपणा आणि त्यावर उमटलेल्या स्वाक्षरीचा रसिक चाहता आहे, तो ही नक्कल चालवून घेणार नाही, असेही ते नमूद करतात. आईबा डिझाइनचे संस्थापक आणि सृजनशील संचालक सौरभ चांदेकर यांच्या मते, ‘एआयची कलेत लुडबुड होणार आहे, हे नाकारून चालणार नाही. पण, त्याकडून अस्सल काम करून घेण्यावर मर्यादा आहेत. उदाहरणार्थ, एखादे दहा रुपयांचे काम दोन रुपयांना करून मिळते आहे, म्हणून ‘एआय’चा वापर झाला, तरी त्यातून मनासारखे काम उतरले नाही, तर ते अस्सल काम करणाऱ्याकडेच वळत आहे. अर्थात, म्हणून ‘एआय’ नाकारून चालणार नाही. वापरणाऱ्यांना अस्सल काय आणि नक्कल काय, हे माहीत होऊन, त्यातील आपल्याला काय हवे आहे, याचा निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे कलावंतालाही ‘एआय’बरोबरचे सहअस्तित्व कसे असेल, हेच शोधावे लागेल.’ हाच धागा पुढे नेत धोत्रे सांगतात, ‘मला तर असे वाटते, की पुढच्या काही वर्षांत याचाही साचलेपणाचा बिंदू येऊन पुन्हा लोक हस्तसिद्ध गोष्टींकडे वळतील, कारण अतिकचरा कालांतराने नकोसाच होतो…’
स्वामित्व हक्काचा मुद्दाही ऐरणीवर
घिबली शैलीच्या ट्रेंडमुळे एआय साधनांना मिळत असलेली छायाचित्रे त्या साधनांच्या प्रशिक्षणाकरिता वापरली जाऊ शकतात, त्यामुळे कॉपीराइटचा भंग होऊ शकतो, असेही प्रश्न समाजमाध्यमांवर उपस्थित होताना दिसतात. त्यावर, ‘मूळ कलाकृतीत, शैलीत काही टक्के बदल असतील, तरी ती स्वतंत्र कलाकृती ठरत असल्याने घिबली शैलीबाबतच नाही, तर एआय करत असलेल्या सर्वच गोष्टींबाबत कॉपीराइटचा मुद्दा सध्या वादविवादाच्याच पातळीवर अधिक आहे,’ असे डॉ. भूषण केळकर यांनी नमूद केले.
© The Indian Express (P) Ltd