पुणे: पंजाबी गायक दिलजित दोसांझ याच्या कोथरूड भागातील संगीत रजनीला झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर यापुढे येथे आगामी काळात होणाऱ्या विविध कार्यक्रमांचे नेमके काय होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दोसांझच्या कार्यक्रमात मद्यसेवनास दिलेल्या परवानगीला विरोध झाल्यानंतर ती रद्द करण्यात आली. मात्र, कार्यक्रम पार पडला.दोसांझ याच्या संगीत जनीत उच्च क्षमतेचे ध्वनिवर्धक वापरण्यात येणार असल्याने आणि या भागातील वाहतूक विस्कळीत होण्याच्या शक्यतेने या कार्यक्रमाला काही संघटनांनी विरोध दर्शविला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तसेच, मद्यसेवनास दिलेल्या परवानगीवरही आक्षेप घेण्यात आले होते. कार्यक्रमापूर्वी दोन दिवस कार्यक्रमस्थळाच्या आसपास काळ्या रंगातील फलकांवर पांढऱ्या अक्षरांत ‘कोथरूडकरांना शांतता हवी’ अशा आशयाचे फलक लावले गेले. काही संघटनांनी याबाबत कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडेही तक्रारी केल्या. त्यामुळे पाटील यांनीही त्याबाबत विरोधाची भूमिका घेतली. ‘या कार्यक्रमामुळे कोथरूड भागातील शांततेला बाधा पोहोचणार आहे. त्यामुळे कार्यक्रमास माझा विरोध आहे. हा कार्यक्रम झाला, तर भारतीय जनता पक्षाकडून मोर्चा काढण्यात येईल, तसेच या मोर्चाचे नेतृत्व मी करीन,’ असा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र, त्यानंतर मद्यसेवनाची परवानगी रद्द करून हा कार्यक्रम पार पडला.

हेही वाचा >>>स्वयंचलितरीत्या नामंजूर प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज आता निकाली; प्रस्ताव सादर करण्यासाठी ३० नोव्हेंबरची मुदत

दोसांझ याचा कार्यक्रम झालेल्या ठिकाणी यापूर्वीही संगीत कार्यक्रम झाले आहेत. तसेच, पुढील दोन महिन्यांत, म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीमध्ये विविध संगीत महोत्सव तेथे होण्याची शक्यता आहे. आधी झालेल्या कार्यक्रमांवेळी या परिसरात वाहतूककोंडी झाली होती.

दिलजित दोसांझच्या कार्यक्रमातील अपेयपानाला विरोध योग्य आहे. मात्र, पूर्ण कार्यक्रमाला विरोध दर्शविण्यात आला, ही दुटप्पी भूमिका अयोग्य आहे. यापूर्वीही येथे अनेक सांगीतिक कार्यक्रम झाले आहेत. त्या वेळी विरोध का करण्यात आला नाही?- सुहास किर्लोस्कर, रहिवासी, डीपी रस्ता

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Question marks over diljit dosanjh upcoming shows after kothrud show pune print news apk 13 amy