संगणकावरील कामाला सरावूनही अजूनही ‘सॉफ्टवेअर’साठी पैसे भरण्याची वेळ आल्यावर त्याची ‘पायरेटेड कॉपी’ धुंडाळणाऱ्या मानसिकतेचा आपला समाज. जिथे सॉफ्टवेअरही पायरेटेड शोधायचे तिथे ‘अँटीव्हायरस’ची काय कथा! अशा वातावरणात केवळ ‘अँटीव्हायरस’ बनवणाऱ्या ‘क्वीकहील’ कंपनीचे बीज पुण्यात पडते. ते केवळ रुजतच नाही, तर देशा-परदेशात पसरते. पूर्णत: पुण्यात उत्पादन करणारी ही कंपनी देशातील ‘अँटीव्हायरस’च्या मार्केटचा ३० ते ३५ टक्के वाटा मिळवते आणि सुरुवातीच्या अवघड काळात पुण्यानेच उचलून धरलेल्या काटकर बंधूंचा हा ‘ब्रँड’ पुण्याला जगाच्या ‘अँटीव्हायरस’ नकाशावर नेतो!

..पुण्यात जन्मून देशोदेशी पोहोचणाऱ्या विविध क्षेत्रांतील ब्रॅण्ड उत्पादनांची यशोगाथा मांडणारे हे सदर..

शाळेत असतानाच काम करायला लागलेला ‘तो’ मुलगा महाविद्यालयात गेलाच नाही. दहावीच्या परीक्षेत पास होण्याची त्याला खात्री नव्हती. त्यामुळे त्याने लगेच नोकरी शोधायला सुरुवात केली आणि ‘कॅल्क्युलेटर टेक्निशियन’ म्हणून त्याला नोकरी मिळालीही. ‘रेडिओ रीपेअरिंग’मधला अनुभव त्याच्या गाठीशी होताच. त्यामुळे इतर अधिक शिकलेल्या मुलांमध्येही तो उठून दिसला आणि चटकन निवडला गेला. कॅल्क्युलेटर दुरुस्त करता करता त्याचे लक्ष इतर वेगवेगळ्या मोठय़ा मशिन्सकडे गेले आणि त्या यंत्रांच्या तंत्रज्ञांना मदत करता-करता त्याचे दुसरे शिक्षण सुरू झाले. पुढे स्वत:चा व्यवसाय करताना याच मुलाला आजूबाजूला एक वेगळेच वारे जाणवू लागले. हा काळ होता देशात संगणक अगदी नवीन असतानाचा. तेव्हाचा भलामोठा आणि सामान्यांपासून दूर असलेला हा संगणक लवकरच फोफावणार, घराघरात पोहोचणार हे त्याने हेरले. लाख-दोन लाखांच्या त्या संगणकांच्या दुरुस्तीची पुस्तकेही पुण्यात न मिळण्याचा तो काळ. तरीही ‘फ्लॉपी ड्राइव्ह’, ‘प्रिंटर हेड’च्या दुरुस्तीत या मुलाने प्रावीण्य मिळवले. पुढे जाऊन या संगणकांवरील माहितीच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस वाढेल आणि तो सोडवण्यासाठी आपण आपल्या धाकटय़ा भावाबरोबर एक मोठी कंपनीच उभी करू असे त्याला तेव्हा वाटलेही नसेल! ‘तो’ मुलगा म्हणजे अर्थातच ‘क्वीकहील’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कैलास काटकर आणि त्यांचे बंधू म्हणजे संजय काटकर.

कैलास काटकर सांगतात, ‘‘माझं काम पाहून माझ्या भावालाही इलेक्ट्रॉनिक्समध्ये काहीतरी करण्याची इच्छा होती. मी मात्र त्याने संगणकासंबंधीचे शिक्षण घ्यावे असा आग्रह धरला. संगणकशास्त्राचा पदवी अभ्यासक्रम पुण्यात तेव्हा नवीनच होता. महाविद्यालयात संगणकांची संख्या कमी असल्यामुळे तो सरावासाठी माझ्या वर्कशॉपवर येत असे. त्याच्या अभ्यासक्रमातील प्रकल्पासाठी काय विषय घ्यावा, असा विचार करत असताना संगणकातील ‘व्हायरस’वर काही करावे असे सुचले आणि तो खरोखरच विविध ‘व्हायरस’साठी संगणकीय ‘टूल’ बनवत गेला. ही ‘टूल’ मी माझ्या ग्राहकांच्या संगणकांवर वापरून पाहू लागलो आणि ती उत्तम चालत असत. त्या काळचे ‘अँटीव्हायरस’ हे व्हायरस शोधायचे, पण त्याने खराब केलेली माहितीची फाइल ‘रीकव्हर’ करता येत नव्हती. संजयची अँटीव्हायरस टूल्स मात्र व्हायरस घालवून फाइल पुन्हा मिळवून द्यायची.’’ याच ठिकाणी ‘अँटिव्हायरस’च्या व्यवसायाची कल्पना प्रथम रुजली. त्यानंतर संजय काटकर यांनी जवळपास वर्ष-दीड वर्ष काम करून त्यासाठीचा पहिला ‘अँटीव्हायरस’ बनवला आणि १९९५ मध्ये ‘क्वीकहील’चा जन्म झाला. पुढे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही उत्पादन नेता यावे या दृष्टीने त्याला नावही विचारपूर्वक दिले गेले.

उत्पादन तयार तर झाले, पण ते विकावे कसे हा एक प्रश्नच होता. इथे उत्पादनाची गुणवत्ता आणखी वाढवण्याची गरज होती. मग उपकरणांच्या दुरुस्तीच्या व्यवसायातील पैसा इकडे भांडवल म्हणून वापरून थोडा-थोडा विस्तार सुरू झाला. मग कैलास हे स्वत:च विपणन करू लागले. ते सांगतात, ‘‘प्रत्येक सॉफ्टवेअर ‘पायरेटेड’च वापरण्याचा तो काळ होता. पण आमच्या उत्पादनाची वैशिष्टय़े सांगितल्यावर ग्राहक त्यासाठी तयार होऊ लागले. माझ्यासारख्या संगणक दुरुस्तीतल्या इतर लोकांना मी या उत्पादनाविषयी सांगायचो, तेव्हा त्यांना ‘पुण्याचे उत्पादन’ म्हणून फार कौतुक वाटायचे. इथे पुणे आमच्या पाठीशी उभे राहिले. शहरातील संगणक देखभाल क्षेत्रातील बऱ्याच कंपन्यांनी पाऊल पुढे टाकून त्यांच्या ग्राहकांपर्यंत हे उत्पादन नेले. असा खप वाढू लागला आणि कंपनी म्हणून आम्ही उभे राहू लागलो.’’

पुण्याबाहेर मात्र सुरुवातीला त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मुंबई, नाशिक, कोल्हापूरच्या माणसाला अँटीव्हायरस वापरताना अडचणी आल्या, तर त्या सोडवणार कशा ही समस्या होती. मग पुण्यातच बसून दुसऱ्या शहरात कार्यालय सुरू करायचे ठरले. पहिले कार्यालय नाशिकमध्ये सुरू झाले आणि पहिल्याच महिन्यात तिथली उलाढाल वाढली. आता पुण्याशिवाय राज्य आणि देशात ‘क्वीकहील’ची ३६ कार्यालये आणि गोडाऊन आहेत. गेल्या ३-४

वर्षांत देशाबाहेर जपान, दुबई, केनिया आणि अमेरिकेतही या कंपनीची कार्यालये सुरू झाली. परंतु हे उत्पादन पूर्णत: पुण्यातूनच तयार होते. पुण्यात अँटीव्हायरस बनवण्यासाठी उत्तम ‘डेव्हलपर’ मिळतात, हे त्याचे प्रमुख कारण. संगणकांनंतर मोबाइलच्या सुरक्षिततेसाठीची उत्पादनेही त्यांनी आणली.

कंपनीचे लक्ष पुढेही संगणकीय सुरक्षिततेवरच राहील, असेही कैलास काटकर आवर्जून नमूद करतात. अशी उत्पादने बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये ‘क्वीकहील’ने पुण्याला जगाच्या नकाशावर आणले, शिवाय माहिती तंत्रज्ञानातील उत्पादन कंपन्यांमधीलही ती देशातील पहिलीच कंपनी आहे. ‘आम्हाला अँटीव्हायरसची गरजच नाही’ पासून ‘इंटरनेटवर अँटीव्हायरस फुकट मिळतोच की,’ पर्यंतच्या ना-ना कारणांमधून ही कंपनी तगली आणि पुण्याचा ‘ब्रँड’ झाली!

sampada.sovani@expressindia.com