परिवर्तनाच्या चळवळीसाठी सर्जनशील व संवेदनशील सच्च्या लेखकांची गरज आहे. परिवर्तनवादाचे अशा लेखकांच्या सर्जनशीलतेचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती व पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या सम्यक साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी जाधव यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां पुष्पा भावे यांच्या हस्ते ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव सन्मान’ देण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. संमेलनाध्यक्षा कवयित्री नीरजा, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष परशुराम वाडेकर, पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक विजय खरे या वेळी उपस्थित होते.
जाधव म्हणाले, की संमेलनांच्या पिकामध्ये वेगळेपण घेऊन येणारे हे संमेलन आहे. साहित्याचे आज वेगवेगळे प्रकार आहेत व प्रत्येकाचा वेगळा विचार आहे. परिवर्तनाच्या चळवळीत साहित्य कुठे आहे, हे पाहिले पाहिजे. सम्यक साहित्य निर्माण करायचे असेल, तर संवेदनशीलता जास्तीत जास्त चिकित्सक कशी होईल हे पाहिले पाहिजे. लेखन ही खरेदी-विक्रीची गोष्ट नाही. परिवर्तनाची चळवळ यशस्वी होण्यासाठी विचारही महत्त्वाचा आहे. त्यामुळे सच्च्या लेखकांची आवश्यकता आहे. लेखकांना आता कोषात राहता येणार नाही. साहित्य हे एकांत व लोकांत याचा मेळ घातलेली गोष्ट असते.
भावे म्हणाल्या, की सध्या खोटय़ाचे राजकारण सुरू आहे. पण, आपला मूल्यांवर विश्वास असल्याने या राजकारणाला आपण सजगपणे सामोरे गेले पाहिजे. आंबेडकरी पायावर आपल्याला उभे राहावे लागणार आहे.

Story img Loader