यंदाच्या रब्बी हंगामात करडई, सूर्यफुलाच्या लागवड क्षेत्रात घटीचा कल कायम राहणार आहे. करडईचे क्षेत्र फक्त २६ हजार हेक्टरवर, तर सूर्यफुलाचे क्षेत्र जेमतेम सहा हजार हेक्टरच्या घरात राहण्याची शक्यता आहे. जवसाची लागवड नगण्य राहील. शेतकरी तेलबियांच्या ऐवजी गहू, हरभरा मका पिकाला प्राधान्य देत आहेत. गव्हाची १०.८५ लाख हेक्टरवर. हरभऱ्याची २१.५८ लाख हेक्टरवर तर ज्वारीची १७.३६ लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
कृषी विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील एकूण पेरणी योग्य क्षेत्र १६६.५० लाख हेक्टर आहे. त्यापैकी खरीप हंगामात १५१.३३ लाख हेक्टरवर पेरण्या होतात. रब्बी हंगामात ५१.२० लाख हेक्टरवर पेरण्या होतात. मागील काही वर्षांपासून रब्बी हंगामात तेलबियांच्या लागवड क्षेत्रात वेगाने घट होत आहे. यंदाच्याही हंगामात तेलबियांच्या लागवड क्षेत्रात घटीचा कल कायम राहण्याची शक्यता आहे. भुईमूग, करडई, सूर्यफूल आणि जवस ही रब्बीतील तेलबियांची पिके आहेत. ही पिके प्राधान्याने मराठवाडा आणि विदर्भात घेतली जातात. सन २०००-२००१मध्ये राज्यात करडईचे क्षेत्र सुमारे तीन लाख हेक्टर होते, ते यंदा करडई फक्त २६ हजार हेक्टरवर येण्याची शक्यता आहे. सूर्यफुलाच्या क्षेत्रातही वेगाने घट होत असून, यंदा जेमतेम सहा हजार हेक्टरवर पेरा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : बदलापुरच्या वेशीवर पुन्हा बिबट्या ; ग्रामस्थांना सावध राहण्याच्या सूचना
हरभऱ्याच्या क्षेत्राच्या होणार वाढ
कमी उत्पादकात, मजूर टंचाई आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी तेलबियांच्या ऐवजी गहू, हरभरा मका पिकाला प्राधान्य देत आहेत. गव्हाची १०.८५ लाख हेक्टरवर. हरभऱ्याची २१.५८ लाख हेक्टरवर तर ज्वारीची १७.३६ लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. २०२०-२१मध्ये गव्हाचे क्षेत्र १३.०६ लाख हेक्टर, रब्बी ज्वारीचे क्षेत्र ३०.२८ लाख हेक्टर, हरभऱ्याचे क्षेत्र १४.३८ लाख हेक्टर होते. मागील वीस वर्षांत रब्बी ज्वारी, सूर्यफूल, करडई या पिकांचा पेरा कमी कमी होऊन हरभरा, गहू, मक्याच्या क्षेत्रात वाढ होत आहे.
तेलबियांचे क्षेत्र प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भात जास्त होते. पण, कमी उत्पादकता, मजूर टंचाई आणि उत्पादन खर्चात झालेल्या वाढीमुळे तेलबियांचे क्षेत्र घटत आहे. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे पाण्याची उपलब्धता आहे. परिणामी रब्बी हंगामाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. संभाव्य वाढ गृहीत धरून बियाणे, खतांसह अन्य निविष्ठांची तयारी सुरू आहे. – विकास पाटील, संचालक (विस्तार आणि प्रशिक्षण)