पुणे : यंदा अतिवृष्टी, परतीच्या पावसाने खरिपाचे मोठे नुकसान केले. मात्र, दमदार पावसाने राज्य पाणीदार झाल्यामुळे रब्बी हंगामातील पेरा वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत नोव्हेंबरअखेर १३५ टक्के पेरणी झाली आहे. नोव्हेंबरअखेर ४० लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या असून, डिसेंबरअखेपर्यंत रब्बीचे क्षेत्र ६५ लाख हेक्टरवर जाईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली.
कृषी विभागाच्या विकास आणि विस्तार विभागाचे संचालक विकास पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरअखेर ३९ लाख २९ हजार ७९२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ही पेरणी गेल्या वर्षांच्या १३५ टक्के इतकी आहे. डिसेंबरअखेर रब्बीच्या पेरण्या होणार असल्यामुळे यंदा त्यात वाढ होऊन ६५ लाख हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे. राज्याचे सरासरी रब्बी क्षेत्र ५५ लाख हेक्टर आहे. गेल्या वर्षी ६० लाख हेक्टवर पेरणी झाली होती.
गव्हाचा पेरा १६० टक्क्यांवर
गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात यंदा नोव्हेंबरअखेर रब्बी ज्वारी १०२ टक्के, गहू १६० टक्के, मका १४० टक्के, रब्बी बाजरी, ओट बार्लीसह अन्य तृणधान्ये ११४ टक्के, हरभरा १५२ टक्के, रब्बी मूग, उडीद, मटकी, पोपटी, मसूर आदी कडधान्ये २११ टक्के, करडई, जवस, तीळ, सूर्यफूल मोहरी, भुईमूग आदी तेलबियांची १४४ टक्के लागवड झाली आहे. कोल्हापूर विभागात सर्वाधिक पेरण्या झाल्या आहेत. अमरावती आणि कोकण विभाग पिछाडीवर आहे.
कापसाचे क्षेत्र रब्बीखाली
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, वऱ्हाड आणि विदर्भात कापसाखालील क्षेत्र मोठे आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यामुळे दोन-तीन वेचण्यातच शिवारातील कापूस संपला आहे. पाण्याची उपलब्धता असल्यामुळे या भागातील कापसाखालील सुमारे ६ लाख हेक्टर क्षेत्रही रब्बीखाली येणार आहे. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात चांगली वाढ होणार आहे.
राज्यभरात पाण्याची उपलब्धता चांगली आहे. खरिपातील नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न म्हणून रब्बी हंगामातील पेरा वाढताना दिसून येत आहे. सिंचनाच्या वाढलेल्या सुविधा आणि चांगला पाऊस झाल्याचा परिणाम म्हणून यंदा रब्बीचे क्षेत्र ६५ लाख हेक्टरवर जाण्याची शक्यता आहे.
– विकास पाटील, संचालक (विकास आणि विस्तार)