गेल्या सात महिन्यांत शहरात रेबिजचे १९ रुग्ण सापडले आहेत. यातील १ जण पुण्याचा, ८ जण पुणे जिल्ह्य़ातील, तर इतर १० जण पुण्याबाहेरचे आहेत. रेबिजच्या एकूण रुग्णांपैकी १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  
पालिकेच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते मार्चपर्यंत दर महिन्याला रेबिजचे ३ रुग्ण सापडत होते. एप्रिलमध्ये सापडलेल्या रेबिजच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक म्हणजे ४ होती. मे महिन्यात १, जून महिन्यात ३, तर जुलैमध्ये रेबिजचे २ रुग्ण सापडले आहेत. रेबिजच्या रुग्णांपैकी केवळ एक रुग्ण पुणे शहरातील रहिवासी असून शहराच्या व जिल्ह्य़ाच्याही बाहेरून नागरिक रेबिजवरील औषधोपचारांसाठी पुण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य उपप्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी दिली. सातारा, नागपूर, लातूर, नाशिक, अहमदनगर आणि बीडमधून रेबिजचे रुग्ण शहरात उपचारांसाठी येत आहेत. डॉ. साबणे म्हणाल्या, ‘‘सप्टेंबर २०१३ पासून आतापर्यंत ८९०६ कुत्र्यांना रेबिजची लस दिली असून त्यांचे निर्बीजीकरणही करण्यात आले आहे. पालिकेच्या १६ प्रसूती रुग्णालयांमध्ये तसेच १० ते १५ दवाखान्यांमध्ये रेबिजवरील उपचार मोफत केले जातात.’’
कुत्रा चावल्यानंतर त्याच्या लाळेतील जिवाणू व विषाणू जखम झाल्याठिकाणी लागतात. त्यामुळे जखमेत जंतूसंसर्ग होण्याचा धोका टाळण्यासाठी ती नळाच्या किंवा सलाइनच्या पाण्याने स्वच्छ धुणे हा महत्त्वाचा प्रथमोपचार असल्याचे विषाणूजन्य रोगांचे तज्ज्ञ डॉ. भारत पुरंदरे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘कुत्रा चावल्याची जखम धुतल्यानंतर रुग्णाला प्रतिजैविक औषधे व धनुर्वाताचे इंजेक्शन दिले जाते. चावलेल्या कुत्र्याला रेबिज असण्याची शक्यता असेल किंवा एखाद्या वन्य श्वापदाने चावा घेतला असेल, तर सहसा जखमेला टाके घातले जात नाहीत. जखमेचे केवळ ड्रेसिंग करून त्यातून जंतूप्रादुर्भाव निघून गेल्यावरच टाके घातले जातात. अर्थातच जखमेतून खूपच रक्तस्राव होत असेल किंवा डोळा किंवा तोंडाच्या जागी कुत्रा चावला असेल, तर टाके घालण्याशिवाय पर्याय नसतो. चावलेल्या कुत्र्याला रेबिज असण्याची शक्यता असेल, तर तो ज्याला चावला आहे, त्या रुग्णाला रेबिजची लस व ‘रेबिज इम्युनग्लोब्युलिन’ हा घटक दिला जातो. रेबिजवरील प्रतिबंधात्मक उपचार घेतल्यानंतर ९० टक्के रुग्णांना रेबिजची बाधा होण्याचा धोका टळतो. परंतु १० टक्के रुग्णांना प्रतिबंधात्मक उपचार घेतल्यानंतरही रेबिजची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.’’
कुत्रा चावल्यावर प्रथम काय कराल?
– जखम त्वरित नळाखाली धरून साबण लावून पाण्याने स्वच्छ धुवा. जखमेतून साबण पूर्ण निघून जाईल याची काळजी घ्या.
– जखम धुतल्यावर तत्काळ रुग्णालयात जा.
– चावलेला कुत्रा पाळीव असेल, तर त्याच्या मालकाकडून त्याला रेबिजची लस दिल्याचे प्रमाणपत्र बरोबर घेऊन जायला विसरू नका.